...तर अखेरच्या श्वासापर्यंत चित्र काढेल !

देशदूत संवाद कट्टा : बॉलपेनने 9 बाय 5 फूट शिवराज्याभिषेक साकारणारे चित्रकार राजेंद्र सोनार यांचा निर्धार
...तर अखेरच्या श्वासापर्यंत चित्र काढेल !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कलावंत कधीच निवृत्त होत नसतो. त्याची कलाच त्याला स्वस्थ बसू देत नाही. मुळात कला हिच जगण्याची खरी उर्मी असते. त्यामुळे कलावंत कोणत्याही चौकटीत सामावले जात नाहीत, असे सांगतांनाच शरिराने साथ दिली तर अखेरच्या श्वासापर्यंत चित्र काढत राहील, आपली कला जोपासत राहील, असा निर्धार प्रख्यात चित्रकार राजेंद्र सोनार यांनी व्यक्त केला.

दै.देशदूतच्या ऑनलाईन संवाद कट्टा या कार्यक्रमात आज ‘ध्येय वेड्या चित्रकाराची अनोखी कहाणी’ या विषयावर चर्चा करण्यात आली. यात वृत्तपत्र छायाचित्रकार, व्यंगचित्रकार, चित्रकार राजेंद्र सोनार यांच्याशी ब्युरोचिफ अनिल चव्हाण यांनी संवाद साधला. श्री.सोनार हे सध्या 9 बाय 5 फुट आकाराच्या कागदावर रंगीत बॉलपेनच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषकाचे दृष्य साकारत आहेत.

एव्हढेमोठे तेही बॉलपेनने आजवर जगभरात कोणीही राज्यभिषकाचे चित्र साकारलेले नाही. त्यामुळे त्यांचा गिनीज वा अन्य जागतीक विक्रमासाठीचा प्रयत्न आहे. यासंदर्भात श्री.सोनार यांच्याशी संवाद साधून या चित्रासह त्यांच्या कलात्मक आयुष्याचे धागे चर्चेतून उलगडण्यात आले.

श्री.सोनार म्हणाले, वडिल वनखात्यात नोकरीला असल्याने स्वाभाविकच त्यांची अपेक्षा आपण सरकारी नोकरी करावी अशी होती. परंतु आपल्या डोक्यात वेगळेच काहीतरी घोळत होते. त्यांच्या सरकारी कार्यक्रमाचे छायाचित्रे काढण्याची ऑर्डर आपल्याला मिळत असल्याने हा मुलगा छान छायाचित्रे काढतो, या गुणवत्तेवर आपला वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून प्रवेश झाला.

चित्रकलेची आवड शालेय जीवनापासून होती. खरे तर आईने चित्र काढण्याची प्रेरणा दिली. शाळेला बक्षिसे हवे असल्याने शिक्षकांनी प्रत्येक चित्रकला स्पर्धेत आपल्याला पुढे केले. यातुनच घडत गेलो. छायाचित्रे काढता काढता संपादकांच्या सूचनेने व्यंगचित्रे काढू लागलो. 42 वर्षांपासून आपण वृत्तपत्रांशी निगडीत आहोत.

आजवर दहा हजारापेक्षा जास्त व्यंगचित्रे प्रकाशित झाले आहेत. अमिताब, राजकपूर, मनोजकुमार, राजेशखन्ना यासारख्या कितीतरी कलावंतांचे चित्र साकारले. या माध्यमातून राजकपूर, बाळासाहेब ठाकरे, मंगेश पाडगावकर यांच्यासह अनेक दिग्गज कलावंत, साहित्यीक, राजकीय नेते यांच्याशी प्रत्यक्ष भेटी झाल्यात. अनेकांचे चित्र काढून त्यावर त्यांच्या स्वाक्षर्‍या घेतल्यात. आतापर्यंत आपण काढलेल्या छायाचित्रे व चित्रांचे 20 पेक्षा जास्त प्रदर्शनेही भरविण्यात आली आहेत.

केवळ छायाचित्र किंवा चित्रच नव्हे तर बॅन्जो वादनाचा, बासरी वादनासह 25 ते 30 कला आपल्याला अवगत आहेत. बासरीच्या छंदापोटी स्वतःच घरी बनविलेल्या वेगवेगळ्या बासरींचाही संग्रह आपल्याकडे आहेत. यात जगप्रसिध्द बासरी वादक हरीप्रसाद चौरसीया यांच्याकडून मिळालेल्या बासरीचाही समावेश आहे. कोरोना कालावधीत आपण वादनाशी संबंधित कलेचा अनेकांना आस्वाद दिला. ऑनलाईन माध्यमातून सादर केलेल्या कलेला भरभरुन प्रतिसाद मिळाला.

अशी सूचली संकल्पना

आजपर्यंत खूप चित्रे काढलीत. यात बॉलपेनने काढलेल्या असंख्य चित्रांचा समावेश आहे. मात्र वेगळे काहीतरी करावे असे सातत्याने डोक्यात घोळत होते. यातच एका पत्रकार मित्राने बॉलपेनच्या माध्यमातून शिवराज्याभिषक साकारण्याची संकल्पना मांडली, त्यासाठी रंगीत बॉलपेनही आणून दिलेत. मग मागील जून महिन्यात 9 बाय 5 फुट आकाराचे शिवराज्यभिषेक काढण्यास प्रारंभ झाला.

एव्हढामोठा कागद मिळेना म्हणून तुकडे- तुकडे जोडून स्केच तयार केले. पुन्हा एका मित्राने कागद आणून दिले. परंतु त्यातूनही तुकडे निदर्शनास येवू लागले. मग दुसर्‍या एका मित्राच्या माध्यमातून पुण्याहून अखंड कागद मागविण्यात आला. आता प्रश्न संगीत बॉलपेनचा होता. ठरावीक रंगांशिवाय इतर रंग मिळणे अवघड होते.

यासाठीही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मित्रांनी सहकार्य करुन मुंबईहून पेन आणून दिलेत. महिनाभरात 35 टक्के काम पूर्ण झाले असून तीन महिन्यात हे संपूर्ण चित्र साकारण्याचा मानस आहे. कोरोडो रेषा आणि एकही चूक न करता काढाव्या लागणार्‍या या चित्रासाठी रोज पाच ते सहा तास अखंडीत काम करावे लागते आहे.

विशेष म्हणजे आजपर्यंत शिवराज्यभिषकाचे वेगवेगळे चित्र आपण पहातो. यात छत्रपतींची साईड पोज आहे. आपण बदल करुन जाणताराजा महानाट्यातील शिवचित्र समाविष्ट केले आहे. छत्रपतींच्या पुर्ण चेहर्‍यांसह इतरही अनेक बदल या चित्रात आहेत.

पत्नी व मुलांची कायमच मोलाची साथ आहे. हे चित्र पूर्ण झाल्यावर विकण्यापेक्षा मुंबईत साकारल्या जाणार्‍या भव्य शिवस्मारकाच्या गॅलरीत ते असावे, अशी आपली इच्छा आहे.

नवकलावंतांनी तेच ते करण्यापेक्षा इतरांपेक्षा वेगळे करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपली निराळी वाट शोधावी, तरच इतिहास घडतो, असा ज्येष्ठत्वाचा सल्लाही त्यांनी दिला.

आदिशक्ती एकविरेचे अनोखे रुप

छायाचित्रकार असल्याने आजवर असंख्य छायाचित्रे काढली. परंतु दिवाळीतील दीपोत्सवात आदिशक्ती एकविरा देवीचे पणत्यांच्या प्रकाशात उजळलेले दृष्य टिपण्याचे भाग्य मिळाले. याचेच भव्य चित्र बॉलपेनच्या माध्यमातून काढण्याचा मानस आहे. याशिवाय खा.डॉ.सुभाष भामरे यांनी सूचित केल्यानुसार सरदार वल्लभभाई पटेल यांचे बॉलपेनने भव्य चित्र साकारल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घालून देण्याचे आश्वासीत केले आहे. यानंतर तोही प्रयत्न केला जाईल, असे श्री.राजेंद्र सोनार यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com