म्युकरमायकोसीस : पुढच्या शंभर दिवसात पळणार

डॉ.चारुहास जगताप यांचा विश्वास, देशदूत व रोटरी धुळे क्रॉसरोडचा उपक्रम
म्युकरमायकोसीस : पुढच्या शंभर दिवसात पळणार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोनाची बाधा झालेल्या काही रुग्णांना साधारणतः दोन आठवड्यां नंतर म्युकरमायकोसीस या आजाराची बाधा होते आहे. याबाबत आज कमालीची भिती असून मृत्यू पावणार्‍यांची संख्याही जाणवते आहे.

परंतु वैद्यक शास्त्रात सुरु असलेल्या उपचार संशोधनामुळे पुढच्या शंभर दिवसात आपण म्युकोरमाकोसीस पूर्णपणे बरा करण्यात यश मिळवू शकतो, असा विश्वास डॉ.चारुहास जगताप यांनी व्यक्त केला. तरीही कोरोनाबाबत आपल्याला खबरदारी घ्यावीच लागेल असेही ते म्हणाले.

रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड आणि दै. देशदूतच्या वतीने विधायक, मार्गदर्शक उपक्रम राबविण्यात येत आहे. यात दररोज सायंकाळी 4 वाजता विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन सुरु आहे. या उपक्रमात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ.चारुहास जगताप यांनी करोना नंतरची व्याधी म्युकरमायकोसीस आणि उपचार या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ.जगताप म्हणाले डिसेंबर 2019 मध्ये चिनच्या हुवान शहरातून सुरु झालेला कोवीड 19 चा प्रवास या दीड वर्षात आपल्या पर्यंत आणि अगदी ग्रामीण भागातील खेड्या पाड्यापर्यंत पोहचला आहे. पहिल्या लाटेत भारताने केलेले उपाय आणि खबरदारी पाहता दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही असे वाटत होते.

मात्र मार्च 2021 पासून दुसर्‍या लाटेने थैमान घातले. अवघ्या अडीच महिन्यात मागच्या वर्षापेक्षा जास्त रुग्णांची संख्या वाढली. या विषाणूने आपले स्वरुप बदलले आणि एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त व्यक्तींवर हल्ला करणे सुरु केले. याचे परिणाम आपण पाहतोच आहोत. यासाठी उपलब्ध उपचार पध्दतीचा तसेच निदान आणि नव्या तंत्रांचा वापर करुन वेगवेगळे डॉक्टर्स प्रयत्न करीत आहेत.

मात्र जनतेतून पाहिजे त्या प्रमाणात खबरदारी न घेतल्या गेल्यामुळे देखील करोनाचा प्रसार झाल्याचे जाणवते. यामुळे सरकारी यंत्रणेसह सगळ्यांवरच कमालीचा ताण वाढला आहे. यातूनही मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आजार तसा जूनाच

म्युकरमायकोसीस हा तसा जुनाच आजार आहे. जगभरात हजारो बुरशी आहेत. यापैकी 300 प्रकारच्या बुरशींमुळे मनुष्याला आजार होवू शकतात. त्यातही आपल्या प्रतिकार क्षमतेमुळे आपण अनेक आजारांवर मात करतो. म्युकरमायकोसीसचा धोका मोठा असला तरी डोळे दुखणे, भोवताली सूज, नाक बंद होणे, नाकातून द्रव येणे, चेहरा सुजणे, दात दुखणे यासारखी लक्षणे आढळताच योग्यवेळी उपचार करुन आपण यावर देखील मात करु शकतो. काही प्रमाणात घातक औषधांचा परिणाम होतो आहे. परंतु परिस्थितीनरुप कराव्या लागणार्‍या उपचाराचा तो भाग आहे. तरीही पुढच्या काही दिवसात आपण म्युकरमायकोसीसवर पूर्णपणे विजय मिळविलेला असू असेही डॉ.जगताप म्हणाले.

दै.देशदूत- रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड, रोटरी क्लब चोपडा आणि रोटरीक्लब पलावा यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com