अवघ्या सहा मिनिटांची ‘वॉक् टेस्ट’ ठरविते क्षमता

डॉ.सागर वाघमारे : एक पाऊल निरोगी आयुष्याकडे, देशदूत व रोटरी धुळे क्रॉसरोडचा उपक्रम
अवघ्या सहा मिनिटांची ‘वॉक् टेस्ट’ ठरविते क्षमता

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

खरेतर करोनामुळे श्वसनाचे महत्व वाढले असून सगळ्यांना ते कळू लागले आहे. एकेका श्वासासाठी तरसणारे रुग्णही आपण बघत आहोत, अशी वेळ येवू नये यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता वाढवून स्वतःला सक्षम ठेवणे गरजेचे आहे. हे तपासण्यासाठीच सहा मिनीटांची वॉक् टेस्ट महत्वाची ठरते. यामुळेच आपल्याला उपचाराची गरज आहे की नाही हे ठरविता येते, असे डॉ.सागर वाघमारे यांनी सांगितले.

रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड आणि दै. देशदूतच्या वतीने विधायक, मार्गदर्शक उपक्रम राबविण्यात येत आहे. यात दररोज सायंकाळी 4 वाजता विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन सुरु आहे. या उपक्रमात फिजिओ थेरेपीस्ट डॉ. सागर वाघमारे यांनी श्वसनाचे तंत्र आणि फिजिओ थेरेपी या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ.वाघमारे म्हणाले, सध्या आपण सारेच कोरोनाच्या सावटात आहोत. कोरोनाचा विषाणू तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच भोवती घोंगावतो आहे. कोण, केव्हा, कसा बाधित होईल हे सांगता येत नाही. यामुळेच खबरदारी घेण्याची जबाबदारी वाढली आहे. फिजिओ थेरेपी या उपचार पध्दतीचा देखील करोना बरा होण्यासाठी किंबहुना कोरोना होवूच नये यासाठी उपयोग होतो आहे.

मुळात करोनाचा विषाणू नाकाद्वारे आत प्रवेश करतो. सर्वप्रथम तो श्वसन प्रक्रियेवर आघात करतो. याचा थेट संबंध फुफ्फुसांशी येतो. बाधित रुग्णांची ऑक्सीजन लेव्हल कमी होते. कृत्रिम ऑक्सीजनच्या मदतीने प्राण वाचविण्याची धडपड सुरु होते. असे घडू नये यासाठी आपली श्वसनक्रिया उत्तम असायला हवी.

आपली प्रतिकार क्षमता चांगली असायला हवी. फिजिओ थेरेपी भौतीक, आर्थोपेडीक, न्युरोलॉजीकल, कार्डीओलॉजी अशा विविध प्रक्रियेतून उपकारक ठरते. फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी श्वसन तंत्र यात सांगितले जातात. श्वासाचे व्यायाम करुन घेतले जातात. फुफ्फुसात हवा थांबवून ठेवणे, दीर्घश्वास घेवून पोटात हवा साठवून ठेवणे. श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रियेचे तंत्र यात शिकविले जातात.

हे नक्की करुन बघा

अमेरिकन हेल्थ असोसिएशनने सिक्स मिनिट वॉक् टेस्ट अमलात आणली आहे. आपणही करु शकतो. घड्याळात वेळ लावून धाप लागेल इतक्या जोरात (न पळता) अवघे सहा मिनिटे चालून बघा. ते संपल्यावर आपला श्वास मोजा, श्वासांची गती नॉर्मल होण्यासाठी किती वेळ लागतो ते बघा. यात बराच कालावधी लागणार असेल तर आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या. नियमीत व्यायाम, सकस आहार, सकारात्मक विचार आणि आनंदी जीवन शैली हेच आपल्या उत्तम आयुष्याचे खरे मंत्र आहेत.

दै.देशदूत- रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड, रोटरी क्लब चोपडा आणि रोटरीक्लब पलावा यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com