योग साधनेतून वाढते शरिरातील ऑक्सिजनची पातळी

डॉ.जगदीश गिंदोडीया : श्वसन आणि योगाभ्यास, देशदूत व रोटरी धुळे क्रॉसरोडचा उपक्रम
योग साधनेतून वाढते शरिरातील ऑक्सिजनची पातळी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कोरोना बाधितांसह त्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांमध्ये कमालीचे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. करोना झाला म्हणजे आपण आता मरणारच असे डोक्यातून काढून टाका. सर्वप्रथम भिती घालवली पाहिजे. कोरोना झालाच तर बचाव कसा करता येईल याचे नियोजन करुन कोरोना होवूच नये याबाबतची खबरदारी घेतली तर आपण या संकटावर नक्कीच मात करु शकतो, असा विश्वास डॉ.जगदीश गिंदोडीया यांनी व्यक्त केला. यासोबतच योगाभ्यासाच्या माध्यमातून प्रतिकार क्षमता वाढवितांनाच आपल्या शरिरातील ऑक्सिजनचही पातळी देखील वाढविता येते, असेही ते म्हणाले.

रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड आणि दै. देशदूतच्या वतीने विधायक, मार्गदर्शक उपक्रम राबविण्यात येत आहे. यात दररोज सायंकाळी 4 वाजता विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन सुरु आहे. या उपक्रमात आज त्वचारोग तज्ज्ञ तथा शासनमान्य योगशिक्षक डॉ.जगदीश गिंदोडीया यांनी श्वसन आणि योगाभ्यास या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ.गिंदोडीया यांनी सहज सोप्या पध्दतीने योगसाधनेतील वेगवेगळी आसनांचे दर्शकांसाठी प्रात्यक्षिक करु दाखविले. ओंमकार साधनेने सुरु केलेल्या त्यांनी या प्रात्यक्षिकांमध्ये श्वसनाच्या वेगवेगळ्या क्रिया, आसने आणि त्याचे लाभ याबाबतची माहिती दिली. प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी ओंकार साधना, पोटावर झोपून ऑक्सिजनची पातळी वाढविणे तर हलक्या हाताने छाती आणि पोटावर दणके मारुन फुफुसांची क्रिया वाढविणे. यासोबतच प्राणायामाची ताकद काय आहे याबाबत त्यांनी सखोर माहिती दिली. दीर्घश्वास, पूर्ण श्वास, योगी ब्रिदींग, अनुलोम विलोम, ध्यान साधना आणि मुद्रासनांबाबत देखील त्यांनी प्रात्यक्षीक करुन दाखविले.

करोना विषाणूचा सगळ्यात पहिला आघात श्वसन क्रियेवर, फुफुसांवर होत असल्याने फुफुसांचे कार्य व्यवस्थीत होणे अत्यंत महत्वाचे आहे. श्वास कशापध्दतीने घ्यावा, तो हळुवारपणे कसा सोडावा, साधना करतांना शरिराचे अवयव कसे नियंत्रित ठेवावे किंवा ध्यान धारणेत श्वासावर लक्ष केंद्रीत करतांनाच एक एक अवयव कसा शिथील करावा याबाबतची अत्यंत उपयुक्त अशी माहिती डॉ.गिंदोडीया यांनी दिली.

बहुतांशी रुग्ण कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्यांना त्रास होतो आहे. म्युकरमायकोसीस सारखे आजार जडत आहेत. यासाठी योग हाच सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी प्रत्येकाने दररोज स्वतःसाठी थोडातरी वेळ काढायला हवा. शरिर संपत्तीपेक्षा महत्वाचे दुसरे काहीही नसून आपल्याकडे सारेकाही असतांना, योग ही भारताने जगाला दिलेली देत असतांना आपणच याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही असेही ते म्हणाले.

दै.देशदूत- रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड, रोटरी क्लब चोपडा आणि रोटरीक्लब पलावा यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जलयोगा, अभिनव साधना

पाण्याच्या तळाशी जावून योगा करण्याची साधना धुळ्यात सर्वप्रथम डॉ.जगदीश गिंदोडीया यांनी सुरु केली. याचे त्यांनी अनेकांना प्रशिक्षणही दिले आहेत. लॉकडाऊन काळात साडे चारशेहून अधिक व्हीडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल करुन योगाबाबतचे प्रबोधन केले आहे. कोरोनाबाबत जलनीती पध्दतीचीही ते सखोल माहिती देत असतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com