रेमडेसिव्हरची साठेबाजीसह नफेखोरी केल्यास दाखल होणार गुन्हे

जिल्हाधिकारी संजय यादव : जिल्हास्तरावर भरारी पथकाची नियुक्ती
रेमडेसिव्हरची साठेबाजीसह नफेखोरी केल्यास दाखल होणार गुन्हे

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोना विषाणूबाधित रुग्णांवरील उपचारासाठी असलेल्या रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच त्याचा काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक गठित करण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी हे पथक गठित केले आहे.

उपजिल्हाधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई (भूसंपादन) या पथकाच्या प्रमुख आहेत. याशिवाय महेश व्ही. देशपांडे (सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन), प्रदीप पाडवी (प्रभारी पोलिस उपअधीक्षक, मुख्यालय), डॉ.निखिल शिंदे (प्राथमिक आरोग्य केंद्र, खेडा, ता. धुळे) यांचा या पथकांत सदस्य म्हणून समावेश आहे.

रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होणे, त्याचा काळाबाजार व साठेबाजी रोखणे, विक्री, वितरण व वापरावर भरारी पथकातील सदस्य नियंत्रण ठेवतील.

याशिवाय जिल्ह्यातील रुग्णालयातील एकूण कोविड 19 रुग्णांची संख्या व सध्या रुग्णालयाच्या औषधे विक्री दुकानात उपलब्ध असणार्‍या रेमडेसिव्हर इंजेक्शनच्या साठ्यावर दैनंदिन नियंत्रण ठेवणे, इंजेक्शनच्या खरेदीसाठी येणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांकडे डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन, विहित नमुन्यातील प्रमाणपत्र, रुग्णाचे आधारकार्ड असल्याची खात्री करूनच इंजेक्शनची विक्री केली जाते किंवा कसे यावरही पथकातील सदस्य निगराणी ठेवतील.

रेमडेसिव्हर इंजेक्शनची साठेबाजी, नफेखोरी सुरू असल्याचे निदर्शनास येतील, अशी औषध दुकाने व संबंधित व्यक्ती यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले आहेत.

रेमडेसिव्हर इंजेक्शनची साठेबाजी किंवा नफेखोरी सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी भरारी पथकातील सदस्यांकडे तक्रार नोंदवावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com