लस उपलब्ध असूनही लसीकरण बंद

डॉ.सौरभ म्हणतात सर्वर डाऊन, डॉ.प्रिती म्हणतात सर्वर सुरुच
लस उपलब्ध असूनही लसीकरण बंद

साक्री - Sakari - प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील कासारे आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी होते आहे. परंंतु लस उपलब्ध असूनही लसीकरण बंद आहे. याबाबत त्याठिकाणच्या डॉक्टरांकडून परस्पर विरोधी उत्तरे मिळताहेत.

कासारे गावाची लोकसंख्या आणि आरोग्य केंद्राला जोडलेली गावे पहाता याठिकाणी सेवा मिळणे आवश्यक आहे.

मात्र रुग्णांना वेगवेगळी वागणूक मिळत असल्याचा अनुभव येतो आहे. सध्या लसीकरणाच्या मोहिमेला गती द्यावी.

18 ते 45 दरम्यान वयाच्या नागरिकांना लस द्यावी असे शासन आदेश आहेत. परंतु नागरीक लसीकरणासाठी येत असतांनाही त्यांना लस मिळत नसल्याने आज प्रस्तुत प्रतिनिधीने या केंद्रात जावून वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी उपस्थित डॉ.सौरभ मावची यांनी उडाउडवीची आणि उर्मटपणे उत्तरे दिल्याचा अनुभव आला. लसीकरण का बंद आहे? आम्हाला तांत्रिक अडचणी कोणत्या आहेत याबाबतची माहिती देवू शकत नाही, असे सांगत सर्वर बंद असल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ.प्रिती गावीतांचे स्पष्टीकरण

या आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिती गावीत या थोड्यावेळानंतर केंद्रावर आल्या. त्यांनी सर्वर डाऊन नसूनसर्वरचा प्रश्नच नाही असे सांगत या केंद्रावर बाहेरच्या व्यक्ती लस घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

यामुळे स्थानिक गावकर्‍यांना लस मिळावी यासाठी तुर्त लसीकरण थांबविण्यात आले आहे. 18 ते 45 दरम्यानच्या नागरिकांसाठी 400 लस उपलब्ध झाल्या असून येत्या सोमवार पासून पुन्हा लसीकरण सुरु केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

आतापर्यंत 244 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या. या केंद्रावर नागरिकांची होणारी गर्दी पाहता पोलिसांकडून सुरक्षेसाठी कर्मचारी मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. तर ऑनलाईन नोंदणीला काहीशा अडचणी येत असल्याचेही डॉ.गावीत यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com