जेबापूर ग्रामपंचायतीत 26 लाखांचा अपहार
धुळे

जेबापूर ग्रामपंचायतीत 26 लाखांचा अपहार

सरपंचासह ग्रामसेवकावर गुन्हा; ग्रामसेवक अनिल सोनवणे निलंबीत

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

साक्री तालुक्यातील जेबारपूर ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवकाने खोटी कामे दाखवून, कामे न करता 26 लाख 36 हजार रूपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरपंचासह ग्रामसेवकावर पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामसेवकाला निलंबीत करण्यात आले आहे.

याबाबत विस्तार अधिकारी अमृत पंडीत महाले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जेबापूर ग्रामपंचायतमार्फत 14 व्या वित्त आयोग पेसा पाच टक्के अंबध निधी, ग्रामनिधी व जैवविधी निधी खात्यातून सरपंच जगन्नाथ रामसिंग माले व ग्रामसेवक अनिल विश्वास सोनवणे यांनी संगणमत करून सेल्फव्दारे रक्कमा वटवून कॅशबुकात खर्च नोंदवला आहे.

परंतू सदर कामाचे अंदाजपत्रक, वर्क ऑर्डर, मुल्यांकने प्रमाणे चौकशी संबंधीतांनी उपलब्ध करून दिले नाही. या कामांच्या तक्रारीवरून विस्तार अधिकार आणि अभि. बांधकाम/ग्रा.पा.पु विभाग यांचा अहवाल पाहता त्यांनी कुठलेही कामे न करता कॅशबुकात खोटा खर्च नोंदवून शासकीय निधीचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत साक्री पं.सचे गटविकास अधिकारी व जि.पचे सीईओ यांना कागदपत्रांचे पुरावे मिळाले. त्यावरून सीईओंनी ग्रामसेवक अनिल विश्वास सोनवणे यांना निलंबीत केले आहे.

तसेच शासकीय निधीचा स्वःहितासाठी वापर करून खोटा खर्च नोंदवून 26 लाख 36 हजार 50 रूपयांच्या शासकीय निधीचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी सरपंच जगन्नाथ मालचे व ग्रामसेवक अनिल सोनवणे या दोघांविरूध्द पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक भुषण हंडोरे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com