धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तब्बल 950 पेक्षा जास्त सुधारणांची परिपत्रके लागू करुन शासनाने जीएसटीची प्रक्रिया दिवसेंदिवस क्लिष्ठ केली आहे.

यामुळे व्यापार्यांना त्रास होत असून न कळत झालेल्या चुकांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. या संदर्भात आपला रोष व्यक्त करण्यासाठी धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला. यास व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला.

जिल्हाधिकारी संजय यादव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील जवळपास 70 टक्के व्यापारी हे छोट्या स्वरुपात व्यवसाय करतात.

ते स्वत:च मालक, मुनिमजी मजुरी आणि मेहनत करणारे असतात. हे सर्व वर्गकर प्रणालीपासून दूर होते. परंतू जीएसटी लागू झाल्यापासून प्रत्येक व्यापारी याचा हिस्सा बनले आहेत.

विविध करांचे एकत्रिकरण जीएसटी करण्यात आले असून आतापर्यंत 950 हून अधिक सुधारणांची परिपत्रके लागू करण्यात आली आहेत. यामुळे नजरचुकीने झालेले विवरण पत्रकातील चूक दुरुस्त करता येत नाही.

ज्यांना कर दिला त्यांनी तो भरला नाही तर दंड व व्याजाचा भुर्दंड येतो. विवरण पत्रास उशिर झाल्यास जमा कराचा परतावा नोंदविता येत नाही. काही व्यापार्यांना वर्षाकाठी साधारणत: 25 विवरण पत्र दाखल करावे लागतात.

जीएसटी शासनाने लागू केली असून तो रद्द करण्याचा निर्णय व्यापारी बांधव घेवू शकत नाही. दंड व व्याजाचे दर देखील 18 ते 24 टक्के असून ते जाचक आहेत.

यासह अनेक अडचणी असल्याने व्यापारी वर्ग पुर्णत: त्रासला आहे. शासनाला आपण भावना कळवाव्यात, यातून मार्ग काढावा अशी अपेक्षा याद्वारे व्यक्त करण्यात आली.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना आग्रारोडवरील व्यापार्यांनी तसेच शहरातील इतरही भागातील व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यामुळे विविध संघटनांच्या एकत्रित धुळे व्यापारी महासंघाने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आज शहरात पहावयास मिळाले. सनदशीर मार्गाने व्यापार्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्यात.