अनियमित वेतनामुळे बसचालकाची आत्महत्या

नातेवाईकांसह कर्मचार्‍यांचा ठिय्या
अनियमित वेतनामुळे बसचालकाची आत्महत्या

धुळे । Dhule

राज्य परिवहन महामंडळाच्या साक्री आगाराचे चालक कमलेश बेडसे Kamlesh Bedse यांनी आज दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठी लिहुन कमी पगार, तोही अनियमितपणे होत असल्याने आर्थिक संकटातून आत्महत्या करत असल्याचे म्हणत एसटी महामंडळ प्रशासनाला दोषी धरले आहे. त्यामुळे मदतीसह संबंधीतांवर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांसह कर्मचारी संघटनेने साक्री आगारात ठिय्या आंदोलन सुरू केले. रात्री नऊ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. अखेर विभाग नियंत्रक व तहसीलदारांच्या आश्वासनानंतर नातेाईकांनी आंदोलन मागे घेतले.

कमलेश भिकन बेडसे Kamlesh Bedse (वय 46 रा. छडवेल कोर्डे ता. साक्री) असे मयत बस चालकाचे नाव आहे. त्यांनी आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत जिवनयात्रा संपविली. त्यांच्याजवळ एक चिठ्ठी मिळून आली. त्यात त्यांनी एसटी प्रशासनाला दोषी धरले आहे.

कमी पगार, तोही अनियमितपणे irregular salary होत असल्यामुळे कर्जबाजारी होवून आर्थिक संकटामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. यास एसटी प्रशासनच जबाबदार असल्याचे म्हणत बेडसे यांच्या नातेवाईकांसह कर्मचारी संघटनेने साक्री आगारात ठिय्या आंदोलन सुरू केले. याबाबत कळताच अनेक बस चालक, वाहनांनी आगारात तसेच महामार्गावर बसेस उभ्या करून आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यामुळे बससेवा विस्कळीत झाली होती. तसेच वाहतुक ठप्प झाली होती.

बेडसे याच्या मृत्यूमुळे कुटुंबिय उघड्यावर आले असून त्यांना आर्थिक मदत जाहिर करावी, वारसाला नोकरीत सामावून घ्यावे, संबंधीतांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भुमिका नातेवाईकांनी घेतली.

याबाबत माहिती मिळताच राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर साक्री आगारात पोहोचले. त्यांनी नातेवाईकांसह कर्मचार्‍यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. विभाग नियंत्रक सपकाळ यांनी आश्वासन दिल्यानंतर कर्मचारी संघटनेने आंदोलन मागे घेतले. दरम्यान कमलेश बेडसे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

आश्वासनानंतर नातेवाईकांचे आंदोलन मागे

मृत कमलेश बेडसे यांच्या कुटुंबियांना कायदेशीर आवश्यक तो लाभ मिळून दिला जाईल. तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांच्या वारसाला नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिले. त्यानंतर प्रथम कर्मचारी संघटनेने ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र नातेेवाईकांनी महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यांनाही आश्वासन दिल्यानंतर अखेर आठ ते सव्वा आठ वाजता विभाग नियंत्रक सपकाळ व तहसीलदारांनी नातेवाईकांची समजूत काढत त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर बेडसे यांच्या कुटुंबियांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतल्याचे श्रीमती सपकाळ यांनी देशदूतला सांगितले. त्यानंतर मृत बेडसे यांच्यावर रात्री साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com