थाळनेर - Thalner - वार्ताहर :

येथील पोलिसांनी मोटरसायकल चोरीचे रॅकेट उघडीस आणले आहे. पथकाने सहा दिवसात तीन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या

12 मोटारसायकली जप्त केल्या असून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

थाळनेर पोलिस ठाण्यात दि.24 रोजी दाखल मोटारसायकल (क्र युपी.77 एम 8006) चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरु होता.

त्यादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे हे थाळनेर येथे पेट्रोलींग करत असतांना वरील क्रमाकांची मोटरसायकल गावातील रविंद्र सुरेश सावळे याच्याकडे दिसली.

चौकशी केली असता ती रविंद्र सावळे याने 2-3 दिवसांपूर्वी थाळनेर येथील रहिवासी मुन्ना ईशी याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सुरज उर्फ मुन्ना उर्फ मायकल संतोष ईशी (रा.थाळनेर) याचा ताब्यात घेत मोटरसायकल विकल्याबाबत विचारपूस केली.

सुरूवातीला त्याने उडवा- उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सदर मोटरसायकल वेलकम हॉटेल शिरपूर फाटा जवळून 5 ते 6 दिवसांपूर्वी चोरल्याची कबूली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरु केली.

तेव्हा संशयित संतोष ईशी याच्यासह त्याचा साथीदार टॅब मॅचिंद्र सावळे (रा.थाळनेर) व राकेश पितांबर बागुल (रा.रामसिंग नगर, शिरपूर) या तिघा संशयितांही ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून शहादा, अमळनेर, चोपडा व धुळे शहरातील बायपास जवळील वर्षी फाटा, बेटावद येथून मोटारसायकली चोरुन त्या थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पिळोदा, थाळनेर तसेच शिरपूर तालुक्यातील अर्थे, वाघाडी अशा ठिकाणी विकल्याचे माहिती दिली.

यानुसार 3 लाख 54 हजार रूपये किंमतीच्या 11 मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या तिघा संशयितांकडून आणखी चोरीच्या मोटरसायकली मिळण्याची शक्यता असून या संशयितांमागे आणखी कोण आहे, याचा पोलिस तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, दिवाकर कोळी, सिराज खाटीक, विजय जाधव, निलेश आव्हाड, नरेंद्र पवार, उन्मेश आळंदे, कृष्णा पवार, होमगार्ड प्रविण ढोले, अनिल पावरा, मुकेश कोळी आदींनी केली आहे.