मुर्तिकार राम सुतार म्हणतात, रामाची ही मुर्ती जगात सर्वात उंच
धुळे

मुर्तिकार राम सुतार म्हणतात, रामाची ही मुर्ती जगात सर्वात उंच

धुळे जिल्ह्याची मान पुन्हा अभिमानाने उंचावली

Rajendra Patil

अनिल चव्हाण

धुळे -

अयोध्येतील श्रीरामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे. या मूर्तीची उंची 251 मीटर इतकी आहे. चीनमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्यापेक्षाही (208 मीटर) रामाचा पुतळा उंच असणार आहे. 20 मीटर उंचीचे चक्र 50 मीटर उंचीच्या पायावर असणार आहे. पायाखाली साकारण्यात येणार्‍या डिजिटल संग्रहालयात भगवान विष्णूंचे विविध अवतार असणार आहेत, असे श्री रामाची मूर्ती बनविणारे 95 वर्षीय राम सुतार यांनी सांगितले.

राम सुतार हे दोन वर्षापूर्वी धुळ्यात येऊन गेलेत. सोबत त्यांचे पुत्र अनिल हे ही होते. निमित्त होते सुतार समाजाच्या अधिवेशनाचे. त्यावेळी त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

अयोध्येतील भगवान राम मंदिरात बसविण्यात येणारी रामाची उंच मूर्ती साकारण्याचे काम ते करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 1500 हुन अधिक पुतळे साकारले आहेत. 95 वर्षीय राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. धुळेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.

मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ब्राँझ धातूपासून, दगडापासून आणि मार्बलपासून पुतळे घडविण्यात ते तज्ज्ञ आहेत. सध्या ते दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये स्थायिक झाले आहेत. नोएडात त्यांचा सेक्टर 63 येथे स्टुडिओ असून येथेच ते काही वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे, मूर्ती साकारत आहेत.

राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची 182 मीटर इतकी आहे.

याशिवाय मुंबईत बसविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 137.2 मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा 212 मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, संसदेतील 16 पुतळ्यांपैकी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांसह मौलाना आझाद यांचे पुतळेही त्यांनी साकारले आहेत. असे 50 हून अधिक पुतळे त्यांनी बनवले आहेत. संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात आलेला महात्मा गांधी यांचा ब्राँझपासून बनवलेला 16 फुटी पुतळा सुतार यांनी साकारलेला सर्वाधिक लोकप्रिय पुतळा आहे.

1950 मध्ये राम सुतार हे भारतीय पुरातत्त्व विभागासोबत काम करीत होते. तसेच अजंठा आणि वेरूळ येथील अनेक मूर्तींचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि टागोर अ‍ॅवॉर्डनेही सुतार यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com