धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील गांजा प्रकरण उघडकीस येवून एक महिना उलटूनही जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक यांचा याकडे कानाडोळा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे.

शासकीय यंत्रणा नेमकी कुणाच्या दबावाखाली काम करते आहे? असा सवालही श्री. गोटे यांनी केला आहे.

श्री. गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिरपूर तालुक्यात शासकीय वन खात्याच्या सुमारे 500 एकर जमीनीवर गांजाची लागवड केलेली आहे.

एकूण 1500 एकर जमीनीवर गांजाची लागवड केल्याचे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर महसूल, पोलीस व वन खात्याने एकत्रीतपणे कारवाई करुन काही प्रमाणात गांजा जप्तही केला.

पण जप्त केलेल्या गांजापेक्षा कितीतरी पटीने अधिक गांजा गायब झाल्याची किंवा परस्पर विक्री केल्याची उदाहरणे तेवढीच आहेत.

वस्तुत:, एव्हाना नाशिक विभागाचे पोलीस महासंचालक, नाशिक विभागाचे महसूल आयुक्त, मुख्य वन संरक्षक इत्यादी अधिकार्यांनी आपल्या स्थानिक कर्मचार्यांसह या भागात येवून ठाण मांडून बसायला हवे होते.

परंतू तुरळक हालचालीं व्यतिरिक्त काहीही घडले नाही. अजून पर्यंत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच जिल्हा वन अधिकार्यांनी तर ढुंकुनही पाहिलेले नाही.

दुसर्या अर्थाने हे प्रकरण व्यवस्थीतरित्या दडपून टाकण्याचा प्रयत्नच शासकीय यंत्रणेच्या प्रमुखांनी चालवला असल्याचेही श्री. गोटे यांनी पत्रकात नमुद केले आहे.