कापडणे - Dhule - प्रतिनिधी :

यूपीएससी परीक्षेत येथील यशोदीप उर्फ शुभम मनोहर पाटील याने घवघवीत यश मिळविले.

भारतीय वायुसेना विभागाच्या पायलट (फ्लाईंग ऑफिसर) परीक्षेत यशोदीप पाटीलने देशात तिसरा क्रमांक मिळवित कापडण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

सन 2019-20 या वर्षात झालेल्या यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला. भारतीय वायुसेना विभागात पायलट (फ्लाईंग ऑफिसर) म्हणून दरवर्षी 32 पदे भरली निवड झाली.

सन 2018-19 या वर्षात भारतातून केवळ तीनच विद्यार्थ्यांची या पदासाठी निवड झाली होती. यावर्षीही भारतातून फक्त सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात यशोदीप पाटीलने देशात तिसरा क्रमांक पटकावला.

यशोदीप येथील रहिवाशी तसेच चोपडाई- कोंढावळ (ता.अमळनेर) येथे कार्यरत असलेले उपक्रमशिल शिक्षक मनोहर भास्कर पाटील व ज्योती मनोहर पाटील यांचे चिरंजीव तर आदर्श कन्या हायस्कुलच्या मुख्याध्यापिका उषा पाटील यांचा भाचा आहे.

यशोदीप पाटीलचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चावरा हायस्कुलमध्ये झाले. यानंतर कोटा(राजस्थान) येथे दोन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर अंधेरी येथील एस.पी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.

सिव्हील इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षात यशोदीप पाटील सध्या शिक्षण घेत आहे. त्यांचे तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथे 31 ऑगस्ट पासून प्रशिक्षण सुरू होत आहे. 18 महिने हे प्रशिक्षण चालणार आहे. या निवडीबद्दल कापडणे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.