जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री अब्दुल सत्तार
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री अब्दुल सत्तार|Abadul Sattar
धुळे

रुग्णालयांमधील व्हेन्टिलेटर्स कार्यान्वित करा- पालकमंत्री

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

व्हेन्टिलेटर अभावी कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू होणार नाही, अशी दक्षता आरोग्य विभागाने घेत रुग्णालयांमधील व्हेन्टिलेटर्स तातडीने कार्यान्वित करावेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेत जिल्हा प्रशासनाने व्यापक स्वरुपात जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री (Abadul Sattar )अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्री. सत्तार जिल्हा दौर्‍यावर आहेत. आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, कोरोनाचे नोडल अधिकारी श्रीकुमार चिंचकर, सुरेखा चव्हाण, शशांक काळे आदींसह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, कोरोना विषाणूला नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. मात्र, कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून या विषाणूला प्रतिबंध करावा. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी संयुक्तपणे जिल्ह्याचा दौरा करून आढावा घेत लोकसहभाग मिळवीत.कन्टेन्मेन्ट क्षेत्रांची संख्या कमी करावी. याबाबत पुढील 15 दिवसांत याचा अहवाल सादर करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता पुढील 30 दिवस महत्वाचे असून आरोग्य विभागाने आतापासूनच नियोजन करीत व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजनयुक्त बेड, आवश्यक साधनसामग्री, औषधे उपलब्ध करून घ्यावीत. तसेच आवश्यक मनुष्यबळाची आठवडाभरात भरती करून नियुक्ती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार यांनी अन्नधान्य वितरण, शिवभोजन, रासायनिक खतांचा पुरवठा, पीक कर्ज वाटप, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, कापूस खरेदी आदींचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले, जिल्हा रुग्णालयाकडील दहा अतिरिक्त व्हेन्टिलेटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास उपलब्ध करून दिले आहेत. तसेच औषधे, आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे, असे सांगितले. पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी पोलिस दलाने केलेल्या कारवाईचा आढावा सादर केला. यावेळी जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com