वाळू व गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्‍यांवर कारवाई होणार !

महसूल आणि पोलिस विभागाच्या बैठकीत जिल्हाधिकारी संजय यादव यांचे निर्देश
वाळू व गौण खनिजाची अवैध वाहतूक  करणार्‍यांवर कारवाई होणार !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात वाळूसह गौण खनिजाची अवैध वाहतूक, स्वस्त धान्य दुकानावर वितरीत होणार्‍या धान्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाने कुणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज महसूल आणि पोलिस प्रशासनातील वरीष्ठ अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, प्रदीप देसले, तहसीलदार गायत्री सैंदाणे, सुनील सैंदाणे, आबा महाजन, अपर तहसीलदार संजय शिंदे, विनायक थवील आदी उपस्थित होते.

श्री. यादव म्हणाले, जिल्ह्यातून वाळूसह गौण खनिजाच्या अवैध वाहतूक होणार नाही याची खबरदारी महसूल व पोलिस प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी आपापसात समन्वय ठेवावा. तलाठी, मंडळ अधिकारी यांनीही वाळूसह गौण खनिजाची अवैध वाहतूक होणार नाही याची खबरदारी बाळगावी. वाळूच्या अवैध उत्खननावर तत्काळ कारवाई करीत संबंधितांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत.

धुळे जिल्ह्यातील गोरगरिबांसाठी शासनाकडून स्वस्त धान्य वितरीत केले जाते. या धान्याची अवैध वाहतूक करणार्‍यांविरोधात जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत. या धान्याची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांची वेळोवेळी तपासणी करावी. द्वारपोच धान्य वितरण करणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवावे. तहसीलदारांनी गोदामांची नियमितपणे तपासणी करून अहवाल सादर करावेत असे निर्देश त्यांनी दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com