सहकार्य करा अन्यथा कारवाईला सामोरे जा...

पॅरामेडीकल स्टाफवर होणार कारवाई ?
सहकार्य करा अन्यथा कारवाईला सामोरे जा...

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

पॅरामेडिकल स्टाफने सहकार्य केले नाही अथवा हॉस्पिटल सोडून गेले तर त्यांच्याविरुद्ध रजिस्ट्रेशन रद्द करण्यासह विविध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील. असे निर्देश आयुक्त अजीज शेख यांनी दिले.

शहरातील संबंधित रुग्णालयांच्या प्रमुखांची बैठक आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी श्री. शेख हे बोलत होते.

शहरात कोरोनाविषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांची संख्या वाढल्यास व त्यांना दाखल करण्यासाठी खाजगी रुग्णालयात कोवीड-19 संसर्गग्रस्त रुग्णांसाठी खाटा आरक्षित करणे अनिवार्य झाल्याने मनपा कार्यक्षेत्रातील कार्यरत सर्व हॉस्पिटल्स, नर्सिंग होम नोंदणीकृत खाजगी रुग्णालय मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यामधील किमान 25 टक्के खाटा वैद्यकीय सोयीसुविधा व मनुष्य बळासह आरक्षित करण्याबाबत यापूर्वीच आदेश पारित करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी शहरातील रुग्णालय प्रमुखांची बैठक आयोजित केलेली होती.

ज्या हॉस्पिटलमध्ये 50 बेड पेक्षा जास्त क्षमता आहे अशा ठिकाणी 25 टक्के बेड आरक्षित ठेवणे हॉस्पिटलमधील प्रवेश व बाहेर निघण्याचा मार्ग स्वतंत्र असणे मेडिकल स्टाफ साठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणे शासनाने निश्चित केलेल्या घराची माहिती उपलब्ध बेडची माहिती दैनंदिन दर्शनी भागावर प्रदर्शित करणे रुग्णाला शासनाच्या वैद्यकीय योजना व व विमा पॉलिसी कॅशलेस सुविधा याबाबत माहिती देणे दर पत्रक प्रसिद्ध करणे व तातडीने रुग्णांसाठी हॉस्पिटल सुसज्ज करणे याबाबत आयुक्त अजीज शेख यांनी बैठकीत निर्देश दिले आहेत.

या बैठकीत संबंधित हॉस्पिटलच्या प्रमुखांकडून उपलब्ध बेड ची माहिती घेऊन त्यांच्या अडीअडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच पॅरामेडिकल स्टाफने सहकार्य केले नाही अथवा हॉस्पिटल सोडून गेले तर त्यांच्याविरुद्ध रजिस्ट्रेशन रद्द करणे सह विविध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले जातील. याबाबतची माहिती सर्व स्टाफला द्यावी असेही बैठकीत आयुक्तांनी स्पष्ट केले याप्रसंगी उपस्थित हॉस्पिटलच्या प्रमुखांनी रुग्णांना हॉस्पिटल मार्फत निश्चितच आवश्यक त्या वैद्यकीय सोयीसुविधा दिल्या जातील असा सकारात्मक प्रतिसाद दिला.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर, विनायक कोटे, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ प्रशांत पाटील तसेच शहरातील गणेश मल्टी हॉस्पिटल, चिरंतन हॉस्पिटल, देवरे अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल, इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी, आई एकवीरा मेडिकल इन्स्टिट्यूट, सेवा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, तेजनक्ष हेल्थकेअर निरामय हॉस्पिटल, वरदान हॉस्पिटल, केशरानंद हॉस्पिटल व अन्य प्रमुख हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com