लाचखोर अभियंते एसीबीच्या जाळ्यात

कामाचे बिले देण्यासाठी अडीच लाखांची मागणी, धुळे एसीबीची कारवाई
लाचखोर अभियंते एसीबीच्या जाळ्यात

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या झालेल्या बांधकामाचे बिल कंपनीस अदा केल्याच्या मोबदल्यात 2 लाख 58 हजार रूपये लाचेची मागणी करणार्‍या अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे येथील तक्रारदार कंस्ट्रक्शन कंपनीत साईट इंजिनियर असून ते कंपनीची कामे व कंपनीचा आर्थिक व्यवहार पाहतात. नंदुरबार येथील एका कंस्ट्रक्शन कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर यांच्याकडून आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या बांधकामाचा ठेका घेतला असून हे काम तक्रारदार नोकरीस असलेल्या धुळे येथील बांधकाम कंपनीने करारनामा करुन घेतले आहे.

वस्तीगृहाचे आतापर्यंत झालेल्या बांधकामाचे बिल कंस्ट्रक्शन कंपनीस अदा केल्याच्या मोबदल्यात उपविभागीय अभियंता दिनेश पाटील यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

त्यानुसार दि. 8 जुन रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. तेव्हा उपविभागीय अभियंता दिनेश पाटील यांनी स्वत:साठी व त्यांचे सहकारी कनिष्ठ अभियंता सत्यजित गांधीलकर यांच्यासाठी एकुण 2 लाख 58 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तसेच सत्यजित गांधीलकर यांनी दिनेश पाटील यांना तकारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक सुनिल कुर्‍हाडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच जयंत साळवे, कैलास जोहरे, शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडिले, पुरुषोत्तम सोनवणे, संदीप कदम, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, संतोष पावरा, महेश मोरे, सुधीर मोरे, गायत्री पाटील यांच्या पथकाने केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com