बीडीच्या थोटकावरून दरोडेखोरांच्या टोळीचा पदार्फाश

एलसीबीची दमदार कामगिरी, सामोड्यासह शिंदखेड्यातील दरोड्याची उकल
बीडीच्या थोटकावरून  दरोडेखोरांच्या टोळीचा पदार्फाश

धुळे । (प्रतिनिधी) : Dhule -

घटनास्थळी मिळालेल्या बीडीच्या थोटकावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीचा पदार्फाश केला.

टोळीतील दोन सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सव्वा तीन लाखांच्या 66 इलेक्ट्रीक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान या टोळीकडून जिल्ह्यातील इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

साक्री तालुक्यातील सामोडेतील शैक्षणिक संस्थेचे संचालक शरद दयाराम शिंदे यांच्याकडे दि. 13 रोजी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला होता. पाच शस्त्रधारी इसमांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून घरात झोपलेले शरद शिंदे व त्यांची पत्नी, मुलला रिव्हॉलवरचा धाक दाखवून रोख रक्कमेसह सोन्याचांदीचे दागिने असा एकूण 8 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जबरीने लुटून नेला होता.

याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू होता. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच तत्पूर्वी शिंदखेडा पोलिसात दाखल एका गुन्ह्याच्या घटनास्थळाची देखील पाहणी केली असता दोन्हीही घटनास्थळी बिडीचे अर्धवट जळालेली थोटके दिसून आली. त्या अनुषंगाने दोन्ही गुन्हे एकाच टोळीने केलेले असावेत, अशी खात्री झाल्याने तशा पद्धतीचे गुन्हा करणार्‍यांची माहिती प्राप्त केली. तसेच तांत्रिक बाबींचे विश्लेषण केले असता सदरचे दोन्ही गुन्हे हे देवास, मध्यप्रदेश येथील लाल्या उर्फ रवि देविलाल फुलेरी याने साथीदारांच्या मदतीने केले असल्याची खात्री झाली.

तसेच त्याचे काही साथीदार हे धुळे येथे आल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार काल दि. 26 रोजी त्यांचा शोध घेत असताना एलसीबीच्या पथकाने संशयीत रोहित कैलास चौहाण (वय 19 रा. बावडीया, देवास, मध्यप्रदेश) व अब्दुल सलाम अब्दुल मोमीन शेख (वय 27 रा. भैसाना ता. राणीगंज, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश व ह.मु रा. पूर्व हुडको कॉलनी, धुळे) हे चाळीसगाव रोडवरील शंभर फुटी क्रॉसिंगजवळ दिसून आले. पोलीस पथकास पाहून पळू लागल्याने त्यांना पाठलाग करुन शिताफिने ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शिंदखेडा व पिंपळनेर पोलिसात दाखल वरील दोन्ही गुन्हयांची कबूली दिली. त्यांनी बाभळे शिवारातील अभय न्युट्रेशन कंपनीतून चोरलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या एकूण 66 इलेक्ट्रीक मोटारी हस्तगत करण्यात आल्या. त्याची किंमत 3 लाख 30 हजार रूपये आहे.

दोघांना पुढील तपासासाठी शिंदखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरीत साथीदारांचा शोध सुरू असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील चोरी व घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ताब्यात घेतलेले दोन्ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध देवास, इंदौर व उजैना मध्यप्रदेश) व मुंबई, पुणे येये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्याक पोलिस निरीक्षक संदिप पाटील, उपनिरीक्षक हनुमान उगले, पोहेकॉ संजय पाटील, श्रीकांत पाटील, पोना प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, अशोक पाटील, पोकॉ. रविकिरण राठोड, उमेश पवार, विशाल पाटील, तुषार धारधी, मयुर पाटील, श्रीशैल जाधव, सुनिल पाटील व चालक पोना विलास पाटील यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com