कर्ज नसतानाही कार केली बळजबरीने जप्त

0

व्यवस्थापकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा; एकास अटक

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – फायनान्स कंपनीचे कोणतेही कर्ज नसताना व्यवस्थापकाने सांगितल्याप्रमाणे एक कार बळजबरीने ताब्यात घेत कागदपत्रांवर सह्या घेऊन दमदाटी केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकास अटक करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील सौदान येथील अशोक दिलीप कथले हे एमएच 15, सीएस 8656 या क्रमांकाची स्विफ्ट कार श्रीरामपूरातून घेऊन जात असताना एसटी स्टँडजवळच अचानकपणे मोटारसायकलवरून येणार्‍या काहींनी मोटारसायकल आडवी घातली. चोलामंडल या फायनान्स कंपनीचे कोणत्याही प्रकारचे कर्ज अशोक कथले यांनी घेतलेले नसतानाही त्यांची कार बळजबरीने ताब्यात घेऊन ती ढोले यांच्या पार्किंगमध्ये लावली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या फॉर्मवर सह्या घेतल्या. त्यामुळे घाबरलेल्या या तरुणाने सरळ पोलीस ठाणे गाठले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अशोक दिलीप कथले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजि.नं. 196/2017 प्रमाणे चोलामंडल फायनान्सचे व्यवस्थापक गजानन भांडवलकर, ऋषिकेश भालदंड, अमोल जाधव, ढोले पार्किंगचे अभिजित अशोक ढोले व इतर चार जणांवर भादंवि कलम 395, 341, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अभिजीत ढोले यास अटक केली आहे.

 

LEAVE A REPLY

*