कर्जमाफी म्हणजे नौटंकी : वामन मेश्राम

0

ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा डाव

अकोले (प्रतिनिधी) – राज्य शासनाने शेतकर्‍यांची केलेली कर्जमाफी म्हणजे नौटंकी आहे. कर्जमाफीच्या जाचक अटींमुळे बहुतांशी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित रहाणार असल्याची टीका भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी अकोले येथे पत्रकाराशी बोलताना केली.

कर्जमाफीने शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत तर त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर न करता मतपत्रिकांचाच वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या मागणीसाठी देशव्यापी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही मेश्राम यांनी दिली.

भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आयोजित जिल्हास्तरीय बहुजन जागृती परिषदे साठी मेश्राम काल गुरुवारी अकोले येथे आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी रिपब्लिकन नेते विजय वाकचौरे, अशोक गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेधाध्यक्ष दशरथ सावंत, भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पाटील, पं. स.चे उपसभापती मारुती मेंगाळ, अगस्ती कारखान्याचे माजी संचालक अरुण रुपवते आदी उपस्थित राहणार आहेत.

मेश्राम म्हणाले की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आदिवासींसाठी भारतीय राज्यघटनेची 5 वी आणि 6 वी अनुसूची लागू न करणे व आदिवासींना हक्काच्या वनजमिनीपासून बेदखल करून त्यांना भूकबळीच्या स्तरावर पोहचविणे हे शासक जातीचे षड्यंत्र राबविले जात आहे.

जाती आधारित जनगणना व ओबीसींची जाती आधारित जनगणना न करणे हे ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे शासक जातीचे षड्यंत्र सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. मुस्लिमांच्या सर्व समस्यांचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय नेतृत्वाचा अभाव होय, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र, त्यांच्या मुलामुलींच्या आत्महत्येपर्यंत पोहचणे हे सरकारच्या नवीन आर्थिक धोरण आणि शासक वर्गाच्या शेती व शेतकरी विरोधी नीतीची देन आहे. सुप्रीम कोर्टात सुरु असणार्‍या लढाईची सविस्तर माहिती यावेळी मेश्राम यांनी दिली.

LEAVE A REPLY

*