Friday, April 26, 2024
HomeUncategorizedव्रतस्थ साहित्यिक कै. दिवाकर चौधरी

व्रतस्थ साहित्यिक कै. दिवाकर चौधरी

 विजय सुपडू लुल्हे

डांभुर्णी ता. यावल येथील दिवाकर श्रावण चौधरी एक प्रयोगशील शेतकरी तथापि साहित्यिक म्हणून जिल्ह्यात सुपरिचित आहे. रामायणात रामाचा सेवक म्हणून लक्ष्मणाचे अस्तित्व तदवत केशवसुत वाङ्मय पुरस्कृत कवी ज्येष्ठ बंधू कै. गणेश चौधरी यांचे ते सर्वार्थाने सेवक! भ्रमिष्ठावस्थेत गणेशदांनी 30 जून 1968 मध्ये पत्नीसह मुलांची हत्या केली. त्यावेळी दादांच्या लग्नाला फक्त दोनच महिने झाले होते.

भयग्रस्त संसार पत्नीने करु नये म्हणून ‘हवा असेल तर घटस्फोट घे’ असे पत्नीला सांगितले! धर्मपत्नी सौ. कल्पना सुसंस्कारित… घरंदाज तर दादा भाऊंचे परमभक्त. मनोरुग्ण भावाला सावरण्यासाठी पत्नीकडून तुरुंगात पत्र पाठविले. भावाची कुटुंबाला उणिव भासते या पध्दतीने हा अनोखा मानसोपचार ‘काचेचं मन’ या पुस्तकान्वये मॅजेस्टिक प्रकाशनने काढला.

- Advertisement -

यातूनच दादांमधील लेखक घडला! गणेशदा 1978 ला सुटून घरी आले. हाफहोम ट्रिटमेंट सांगितल्याने त्यांची डायरेक्ट घरी न आणता शेतात… वाड्यात व्यवस्था केली. कवीला जगवणं हाच दादांचा निदिध्यास.. काव्यवाचनाला घेऊन जाणे, मित्रांची मैफिल सांभाळणे अशी प्राणपणाने सेवा करुन त्यांनी 10 वर्षे जगवलं. गणेशदांचे जगणे ‘स्क्रिझोफ्रेनिया’ कादंबरीत मांडून दिवाकरदादांनी लोकांचे गैरसमज घालवले. मात्र, हे मानसचित्रण अक्षर साहित्याचं अजरामर लेणं ठरलं. प्रथमत: मॅजेस्टिकने नंतर आंतरराष्ट्रीय पेंग्विन प्रकाशनाने हिंदीत प्रकाशित केलं. गोव्याचा गोमांतक कालिका पुरस्कार मिळाल्याने दादा साहित्यिक झाले. त्याचवेळी शेतकर्‍यांच्या व्यथांवर आधारित ‘बुर्झ्वागमन’ कादंबरी गाजली. सुप्रसिध्द दिग्दर्शक हितेंद्र उपासनी यांनी ‘बुर्झ्वागमन एक शेतकरी कथा’ हा चित्रपट वैभव मांगले, पूजा नाईक, अभिनित काढला. मामी चित्रपट महोत्सवात त्याची वर्णी लागली.

सामाजिक राजकारणी

दादा डांभुर्णीला दोनदा सरपंच होते. डांभुर्णीसारख्या खेड्यात त्यांनी इदगाव पूल परिषद तत्कालीन महसूलमंत्री उत्तमराव पाटील यांच्या अध्यक्षतेत घेतली. मंत्री जगन्नाथ जाधवही उपस्थित होते. पुलाची मुहूर्तमेढ रोवली पण श्रेय घेतले नाही. गावात वीज आणली. दारुबंदी, जाती निर्मूलन केले. आदिवासी पावरा समाजाला वनजमिनी मिळवून देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला मोर्चे काढले. शेतकरी आत्महत्या प्रकरण गाजत असताना डांभुर्णीला आदर्श शेतकर्‍यांना सत्कारित करुन दिलासा दिला होता. जनता दलातर्फे दोनदा आमदारकीसाठी उभे राहिले. त्यावेळी भाजपची ऑफर मान्य केली असती तर मंत्रिपदी वर्णी लागली असती. मधुकर साखर कारखान्यात 1995ला संचालक झाले. कारभार आस्थापना अंतर्गत मजुरांचे प्रश्न सोडविले.

व्रतस्थ समाजशिक्षक

दुर्घटना घडली. त्यावेळी दोघे भाऊ गावातल्या हायस्कूलमध्ये शिक्षक होते. घटनेनंतर त्यांनी राजीनामा दिला. त्याकाळी पश्चिम भागात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असे. हायस्कूलमध्ये 1996ला संचालक झाले. अखंड 20 वर्षांच्या कार्यकाळात सेमी इंग्लिश वर्ग सुरु केले. संरक्षण भिंत बांधणे, क्रीडांगणासाठी शालेय परिसर सपाटीकरण केले. लहान चिरंजीवासाठी आय.टी.आय. काढा, असे मा. एकनाथराव खडसेंनी सांगितले. मात्र, पुत्रमोह टाळून ग्रामविकासासाठी पुत्रप्रेमाचा त्याग करुन आय.टी.आय. संस्थेअंतर्गत काढून नूतन इमारत बांधली. 2009मध्ये डी.एड. सुरु केले. परंतु ते स्वप्न अपूर्णच राहिले.

तत्त्वनिष्ठ कुटुंबप्रमुख

ज्येष्ठ बंधूंच्या हयातीत लहान चिरंजीव पुरुजितचे दत्तक विधान केले. एवढ्यावरच कृतज्ञता न मानता भावाच्या पश्चात ‘सूर्य मध्यरात्रीचा आणि दोन एकांकिका’,‘नागवा’, ‘काचेचं मन’, ‘तृषार्त नंतरच्या कविता’ ही पुस्तके प्रकाशित केली. दादांचे ज्येष्ठ सुपुत्र सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विवेक चौधरी 2009पासून जळगावला सेवा देताहेत. सुकन्या निवेदिता सुविद्य घराण्यात सुखी आहे. दत्तक गेलेले कनिष्ठ चिरंजीव पुरुजित चौधरी (आदर्श सरपंच पुरस्कृत, डांभुर्णी) व स्नुषा सौ. पल्लवी पुरुजित चौधरी (यावल पंचायत समिती सभापती), राजकीय वारसा चालवीत आहेत. ज्येष्ठ स्नुषा सौ. अंजली विवेक चौधरी नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून जळगावला सेवा देत आहेत.

अजातशत्रू साहित्यिक 
दादा फर्डे वक्ते होते. प्रसंगातील विनोद करण्यात हातखंडा. दादा मैफिल प्रिय होते. बाळकृष्ण सोनवणे, भैय्या उपासनी, नीळकंठ महाजन, सुरेश यशवंत, अशोक कोतवाल, मंगेश काळे त्यांचे जीवलग स्नेही. नवोदित साहित्यिक, कवी नामदेव कोळी, महेंद्र सोनवणे, गोपीचंद धनगर, विजय लुल्हे यांचा त्याच्याकडे नेहमी राबता होता. मागील वर्षांचे पहिले लेवागणबोली साहित्य संमेलन हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. दादा अत्यंत कृतार्थपणे 77 वर्षांचे सुखी, समाधानी कृतार्थ जीवन जगले!
(प्राथमिक शिक्षक)

- Advertisment -

ताज्या बातम्या