साहित्य संमेलनाचा नगरला 18 वर्षांनी मान

0
नेवासा (प्रतिनिधी) – सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक हे समरसता साहित्य परिषदेचे ब्रीदवाक्य असलेल्या व समरसता हे एक जीवनमूल्य आहे असे मानणार्‍या समरसता साहित्य संमेलनाचा अहमदनगरला तब्बल 18 वर्षांनी मान मिळाला आहे.
सामाजिक व साहित्यिक बांधीलकी मानणारी, आणि समाज जागरणाचे काम सातत्याने करणारी समरसता साहित्य परिषद या संस्थेची महाराष्ट्र शाखा, अशी संमेलने दर वर्षी महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यांतून भरवते. 1958 ला जळगाव येथे डॉ आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन घेण्यात आले होते. यानंतर विषयानिष्ट संमेलनांची मालिकाच समरसता साहित्य परिषदेने आयोजित केली.
जळगावनंतर झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अनेक मान्यवर साहित्यिकांनी आपला ठसा उमटवणारे विचार मांडताना सामाजिक समरसतेला पाठिंबा दिला. संमेलनाच्या अध्यक्षपदांची नावे पाहिली असता त्यात डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. बाळकृष्ण कवठेकर, डॉ. अनंतराव तोरो, डॉ. प्रभा गणोरकर, डॉ. विश्वास पाटील, राजा जाधव, डॉ. भीमराव गस्ती, मुझफ्फर हुसेन, डॉ. अशोक कामत, भानू काळे, डॉ. रवींद्र शोभणे, उत्तम बंडू तुपे, मधू जामकर, लक्ष्मणराव ढवळू टोपले, शेषराव मोरे, रमेश पतंगे अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संमेलने झाली. याचे सामाजिक परिणाम दिसत आहेत. सर्व बुद्धिजीवी सामाजिक समरसतेसाठी एकत्र येत असल्याचे चांगले चित्र दिसत आहे.
याच परंपरेत 18 वे समरसता साहित्य संमेलन अहमदनगर येथे रेणावीकर शाळेच्या डॉ. भीमराव गस्ती साहित्य नगरीत भरत आहे. भटक्या विमुक्तांचे साहित्य व समरसता या विषयावरील या संमेलनाचे अध्यक्षपद भटक्या विमुक्तांच्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे पुण्याच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक गिरीश प्रभुणे आहेत. निमंत्रक प्राध्यापक रमेश पांडव, संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड अशोक गांधी, कार्यवाहक नितीन दिनकर, महाव्यवस्थापक चंद्रकांत काळोखे हे आहेत.
या संमेलनात भटक्यांच्या शौर्याचा व संस्कृतीचा वारसा मराठी साहित्यातील भटक्या विमुक्तांचे प्रतिबिंब व भटक्यांचे साहित्य एक आस्वाद असे तीन केवळ भटक्यांच्या साहित्यावर आधारित परिसंवाद होत आहेत. या प्रकारचे साहित्य लिहिणार्‍या लेखकांचा सहभाग आहे तर आम्ही असे घडलो या परिसंवादामध्ये महाराष्ट्राचे अनेक बाबतीत प्रेरणास्थान असलेले लेखक भाग घेणार आहेत. या परिसंवादांच्या माध्यमातून अनेक भटक्यांचे अंतरंग उलगडून समोर येणार आहे. सामाजीक समरसतेच्या या परिसंवादामध्ये विविध चर्चा होणार आहेत. डॉ. लीला गोविलकर, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, संजय सोनवणे व डॉ. पांडुरंग कंद यांच्या अध्यक्षतेखाली हे परिसंवाद होत आहेत.

भटक्यांच्या पारंपारिक वेशभूषेमध्ये व पारंपारिक वाद्यासह निघणारी ग्रंथदिंडी हे या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*