वीजबिल, वीजबंदची माहिती ‘एसएमएस’वर

नाशिक परिमंडळात साडेसात लाख मोबाईल क्रमांकाची नोंदणी

0
ना. रोड | दि. १३ प्रतिनिधी –  वीजबिलांचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती वीज ग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे पाठविण्याची सुविधा महावितरणकडून सुरू झाली आहे. महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणार्‍या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
नाशिक परिमंडळातील जवळपास ७ लाख ५० हजार ग्राहकांनी आतापर्यंत त्यांचे मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदवले आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी त्यांचे मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदवावेत, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

नाशिक परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषीपंपधारक व इतर असे एकूण २३ लाख ३५ हजार ग्राहक आहेत. त्यापैकी जवळपास ७ लाख ५० ग्राहकांनी स्वतःचे मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविले आहेत. मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांच्या मोबाईलवर मासिक वीज बिलाची माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे.

तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील वीजपुरवठा बंद होणार असल्याची पूर्वसूचना ‘एसएमएस’द्वारे मोबाईलवर पाठवण्यात येत आहे. यात वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी लागणार कालावधीही नमूद केलेला असेल. त्यामुळे विजेवरील अत्यावश्यक कामे वीज पुरवठा बंद होण्यापूर्वीच करून घेण्याची संधी ग्राहकांना मिळेल.

महावितरणने कर्मचार्‌यांसाठी तयार केलेल्या ‘कर्मचारी मित्र’ या मोबाईल ऍपद्वारे वीजपुरवठा बंद होणार असलेल्या किंवा झालेल्या वीजवाहिनीची नोंद करण्यात येते. ही माहिती घेऊन संबंधीत वीज वाहिनीवरील ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर वीजपुरवठा बंदबाबतची पूर्वसूचना देणारा ‘एसएमएस’ पाठविण्याची व्यवस्था सुरू झाली आहे.
नाशिक परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील जवळपास साडेसात लाख ग्राहकांनी महावितरणकडे त्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवले असून त्यात नाशिक मंडलातील ३ लाख ८१ हजार ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणकडे एकूण ग्राहकांपैकी जवळपास ३२ टक्के ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद आतापर्यंत झाली आहे.

वीजबिल भरणा केंद्रात नोंदणी अनिवार्य
महावितरणने सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती केली असून त्याद्वारे वीजबिल भरणा केंद्रात ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यात येत आहे. ग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झालेली नसल्यास बिल भरताना मोबाईल क्रमांक सांगणे अनिवार्य आहे. वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून सहकार्य करण्याचे महावितरणने आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

*