अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

0
चांदवड वार्ताहर : शहरातून जाणार्‍या मुंबई-आग्रा महामार्गावर रेणूका मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना सोमवार (दि.५) च्या मध्यरात्री घडली. या परिसरात डोंगररांगा असल्याने वन्यप्राणी शहरात घुसल्याचे प्रकार यापूर्वीही देखील घडले आहेत.

सध्या पावसाने थोड्या-फार प्रमाणात हजेरी लावली असली तरी डोंगराळ भागातील नैसर्गिक जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. यामुळे वन्यजिवांची पाण्यासाठी कायमच वणवण होते. सदर बिबट्या देखील पाणी, अन्नाच्या शोधात डोंगर उतरून खोकड तलावात पाणी पिण्यासाठी आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अशातच मध्यरात्री नंतर चांदवडकडून मालेगावकडे जाणार्‍या अज्ञात वाहनाने बिबट्या महामार्ग ओलांडत असतांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की यात बिबट्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी ए. डी. सोनवणे, एच. बी. उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी येथील सोमा टोलच्या कर्मचार्‍यांनी त्यांना सहकार्य केले.

पशुवैद्यकिय अधिकार्‍यांनी शवविच्छेदन केल्यानंतर नाशिकहून आलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आज मंगळवार रोजी बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*