Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबिबट्या आला; या दोनच गोष्टी करा!…

बिबट्या आला; या दोनच गोष्टी करा!…

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांची सूचना

नाशिक | वैशाली शहाणे (सोनार)

बिबट्या शहरात येणे, कधीतरी त्याने माणसावर हल्ला करणे, त्यात ती व्यक्ती जखमी होणे अशा घटना अनेकदा घडतात. पण यात दोष कोणाचाच नसतो. सगळे परिस्थितीचे बळी असतात असे आपण म्हणू शकतो. पण बिबट्या तुमच्या वस्तीत आलाच तर दोनच गोष्टी करा. पहिली म्हणजे वनखात्याला कळवा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बिबट्याला जायला मार्ग मोकळा करून द्या.

- Advertisement -

अशी सूचना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी केली आहे. मुंबईच्या संजय गांधी उद्यान परिसरात बिबळे आणि मानव संघर्षाच्या अनेक घटना घडल्या. त्यावर उपाय म्हणून ‘ बिबटयासह जगा ( लिव्हिंग विथ लेपर्ड ) ‘ ही मोहीम अनेकांच्या सहकार्याने राबवली गेली. ती कमालीची यशस्वी ठरली. या मोहिमेमुळे बिबट्या आणि मानव संघर्षाच्या घटना घडण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले. ती कल्पना लिमये यांचीच.

प्रश्न – बिबट्या जंगलाबाहेर का दिसतो?

उत्तर- त्यासाठी बिबट्या मानवी वस्तीत का येतो हे समजावून घ्यायला हवे. जंगलात त्याला खाद्य मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. चितळ मारायचे म्हंटले तरी खूप प्रयत्न करावे लागतात. त्या तुलनेत मानवी वस्तीच्या जवळ त्याला त्याचे खाद्य खूप सहज मिळते हे त्याच्या लक्षात आले आहे. बिबट्या कुत्री, डुक्कर, मोठ्या घुशी खातो. त्याच्या ओढीने तो मानवी वस्तीजवळ येतो.

प्रश्न – तो मानवी वस्तीजवळ येऊ नये यासाठी काही करता येईल का?

उत्तर – नक्कीच ! त्याला घाण, रस्त्यावर फेकलेले खरकटे खूप आवडते. कारण तिथे भटकी कुत्रा, डुक्करे, घुशी जमा होतात. तुम्हाला बिबट्या तुमच्या वस्तीजवळ येऊ द्यायचा नसेल तर आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. खरकटे, अन्नपदार्थ. कचरा उघड्यावर फेकू नका. कुत्री, डुक्करे गोळा होणार नाहीत याची दक्षता घ्या. म्हणजे त्यांच्या ओढीने बिबट्या येणार नाही.

प्रश्न – बिबट्या दिसला तर काय करावे?

उत्तर- दोनच महत्वाच्या गोष्टी करा. पहिली म्हणजे त्वरित वनविभागाला कळवा आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बिबट्याला जायला मार्ग मोकळा करून द्या. बिबट्या शहरात दिसला की लोकांमध्ये उत्सुकता जागी होते. तेही स्वाभाविक मानले पाहिजे. लोक जिथे बिबट्या असेल तिथे खूप गर्दी करतात. आरडाओरड करतात. मोबाईलमध्ये फोटो काढतात. लगेच समाजमाध्यमांवर टाकतात. पण त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण होते. त्यामुळे गर्दी अजूनच वाढू शकते. गर्दीमुळे अनेक तोटे होतात.

बिबट्या अजुनच घाबरतो-बिथरतो. तिथून पळून जायचा प्रयत्न करतो. पण गर्दीमुळे त्याला रस्ता सापडत नाही. या सगळ्या गोंधळात तो आणि माणसांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. काही घटनांमध्ये काही अतिउत्साही लोक स्वतःच जाळ्या घेऊन बिबट्याला पकडायचा प्रयत्न करतात. पण लक्षात घ्या बिबट्याला पकडणे हे वनखात्याचे काम आहे. पण अनेकदा गर्दीमुळे त्यांना त्यांचे काम करता येणे मुश्किल होते. बिबट्या तुम्हाला पहिल्यांदा दिसला असला तरी त्याने त्याआधी तुम्हाला दहावेळा तरी पाहिलेले असते असे म्हंटले जाते.

तेव्हा बिबट्या आला तरी आपल्या उत्सुकतेला आळा घाला. गर्दी करू नका. बिबट्याला जायला मार्ग मोकळा ठेवा. वनखात्याला त्यांचे काम शांतपणे करू द्या. असे प्रसंग खूप संवेदनशीलतेने हाताळायचे असतात. जंगल कमी कमी होत आहे. आपण त्यांच्या जागेवर राहात आहोत. तुम्ही बिबट्याला शिकवू शकत नाही पण मानवाला शिकवू शकता. त्यामुळे आपल्याला बिबट्यांबरोबर राहायला शिकावे लागणार आहे. हे कधीच विसरू नका.

सर्वांच्या सहकार्याने लोकशिक्षण 

असे प्रसंग कसे हाताळायचे यासाठी लोकशिक्षण मोहीम सर्वांच्या सहकार्याने अंमलात आणावी लागेल. बिबट्या दिसतो एक-दोनदाच. पण त्याची चर्चा खूप दिवस सुरूच राहाते. तो दिसल्याचा-त्याने हल्ला केल्याच्या अफवाही पसरतात. तो आणि माणसांच्या संघर्षाचे व्हिडीओ फिरतात. बिबट्याला गुन्हेगार ठरवणे योग्य नाही. लोकांनी स्वच्छता राखावी. वनखात्याने तो दिसलाच तर त्याला पकडावे. अशा पद्धतीने संबंधित सर्वांच्या सहकार्याने या घटना सकारात्मक पद्धतीने मार्ग काढता येऊ शकतात.

शिवाजीराव फुले, उपवनसंरक्षक, पश्चिम नाशिक. 

- Advertisment -

ताज्या बातम्या