Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : बिबट्याच्या मादीचा उपचारादरम्यान मृत्यू; सिन्नर तालुक्यातील चास येथून केले होते जेरबंद

Share
सिन्नर (अजित देसाई) | भोजापूर खोऱ्यातील चास शिवारात आज (दि.20) सकाळी 7 वाजता डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या शेताच्या बांधावर आढळून आलेल्या बिबट्याच्या मादीला तब्बल 5 तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने सुरक्षित रित्या जेरबंद केले.
आजारी असलेल्या मादीवर मोहदरी घाटातील वन उद्यानात उपचार सुरू असताना अवघ्या तासाभरातच मृत्यू झाला. कावीळ व कॅन्सर सारख्या आजाराने या बिबट्या मादीला पछाडले असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
नांदुरशिंगोटे चास रस्त्यावर असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी भाऊपाटील खैरनार यांचे शेत आहे. आज सकाळी शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या खैरनार यांना डोंगराच्या पोटाशी असलेल्या बांधावर बिबट्याचे दर्शन घडले. पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या काहीसा लंगडत असल्याचे पाहून खैरनार यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सिन्नर येथील वनविभागाच्या कार्यालयात संपर्क साधला.
वनक्षेत्रपाल प्रवीण सोनवणे यांनी या घटनेची माहिती मिळताच आपल्या सहकाऱ्यांसमवेत चास गावाकडे धाव घेतली. रस्त्याला लागून व 50 ते 60 आदिवासी कुटुंबाची वस्ती असलेल्या ठिकाणी हा बिबट्या नजरेत पडल्याने बघ्यांची झुंबड उडाली होती. वन विभागाचे पथक पोहोचल्यावर प्रथम दर्शनीच हा बिबट्या आजारी असल्याचे निष्पन्न झाले.
कारण तो सुदृढ असता तर या ठिकाणी थांबला नसता. तसेच बघ्यांवर आक्रमण करायलाही त्याने मागे पुढे पाहिले नसते. वन कर्मचाऱ्यांनी परिसरातील गर्दी आठवत बिबट्या असणाऱ्या परिसरात संरक्षक जाळी बांधली. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुमारे पाच तास प्रयत्न करावे लागले.
शेतालगत झाडीतून बिबट्याला डोंगराच्या भागात हुसकवण्याचे प्रयत्न प्रारंभी झाले. मात्र, तो आजारी असल्याने या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर बंदुकी द्वारे भुलीचे इंजेक्‍शन सोडून दाट झाडीत आश्रय घेतलेल्या बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले. त्याला उपचारासाठी तातडीने मोहदरी येथील वन उद्यानात हलवण्यात आले.
सिन्नर पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने उद्यानात येत या बिबट्यावर उपचार सुरू केले. पूर्ण वाढ झालेल्या या बिबट्या मादीच्या अंगात ताप असल्याने प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अवघ्या तासाभरात तिने प्राण सोडले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असता तिच्या पोटात जनावरांना होणाऱ्या क्रोनिक कॅन्सरशी साधर्म्य असणारी गाठ आढळून आली.
याशिवाय तिच्या अंगावर मोठ्या प्रमाणात गोचीड पडले होते. जनावरांमध्ये होणाऱ्या केस गळण्याचा आजाराची बाधा झाल्याने या मादीच्या पोटावरील केस बहुतांशी निघून गेले होते. तसेच पायांवर व पोटाच्या काही भागात जखमा देखील झाल्या होत्या. काविळीची साधर्म्य सांगणारी लक्षणे देखील आढळून आल्याचे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सदर बिबट्याच्या मृत्यूबाबत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल देऊन सिन्नर येथील विशेष संरक्षित वनक्षेत्रात या बिबट्यावर अंत्यविधीचे सोपस्कार पार पडले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!