अधिकारांचे अवास्तव केंद्रीकरण?

0
विरोधकांच्या एकजुटीमुळे सत्ताधारी भाजपपुढे ‘महाआघाडी’चे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र ते मान्य करायला सत्ताधारी नेते राजी नाहीत. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत विरोधकांच्या एकजुटीची खिल्ली उडवली गेली. आमच्यापुढे विरोधकांचे कोणतेच आव्हान नाही.

देशात पुढील पन्नास वर्षे भाजपचीच सत्ता राहील, असे अहंकारी वक्तव्य भाजप नेतृत्वाने केले. पंतप्रधानांना मात्र वास्तवाचे भान असावे. विरोधकांच्या महाआघाडीचे आव्हान त्यांनी ताडले आहे. देशातील छोट्या-छोट्या समाजघटकांना खूष करून मतांची बेगमी आतापासूनच सुरू केली आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची पुनर्स्थापना करून दीन-दलितांची सहानुभूती मिळवण्याच्या दिशेने त्यांनी पहिले पाऊल टाकले. त्याआधी केंद्रीय सेवकांना सातवा वेतन आयोग लागू केला. नंतर महागाई भत्त्याच्या मधाचे बोटही चाटवले. परवा अंगणवाडी सेविकांना दिवाळीपूर्वीच ‘भाऊबीज’ दिली.

त्यांच्या तुटपुंज्या मानधनात ‘घसघशीत’ भासवून तुटपुंजीच वाढ केली. मानधन म्हणून अंगणवाडी सेविकांना मिळणारा मोबदला त्यांच्या कामाच्या तुलनेत तसा नगण्यच आहे. भडकत्या महागाईत एवढ्या पैशांत त्यांच्या कोणत्या गरजा पूर्ण होतील? अंगणवाडी सेविका मानधनवाढीत पंतप्रधानांनी लक्ष घालण्याइतका तो राष्ट्रीय प्रश्न आहे का? राज्यांच्या महिला-बालविकास खात्याच्या मंत्र्यांनी अंगणवाडी सेविका मानधनवाढीची घोषणा केली असती तरी फार बिघडले नसते.

अशा प्रत्येक लहान-सहान प्रश्नात पंतप्रधानांनी लक्ष पुरवणे गरजेचेच आहे का? विद्यमान सरकारची साडेचार वर्षे पूर्ण झाली तरी बेरोजगारी, गरिबी, महागाई यांसारखे गंभीर प्रश्न कायम आहेत. विजय माल्ल्या, नीरव मोदीसारखे नगिने देशाला लुटून विदेशात पसार झाले आहेत. ‘राफेल’ विमान व्यवहाराचा वादग्रस्त मुद्दा ऐरणीवर आहे. त्याबाबत पंतप्रधान अवाक्षर काढत नाहीत. असे ज्वलंत व खरे प्रश्न दडवून जनतेचे लक्ष विचलित केले जाते.

या प्रश्नांचे पंतप्रधानांकडे उत्तर नाही किंवा ते उत्तर देऊ इच्छित नाहीत, असा अर्थ जनतेने घ्यावा का? सर्वच निर्णय व अधिकारांचे केंद्रीकरण होणार असेल तर मंत्री आणि नेत्यांना कोणते काम उरणार? लोकशाहीला ते किती पोषक आहे? त्यामुळेच नेत्यांचा वाचाळपणा वाढला का? सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गणेशोत्सवात ‘डीजे वाजणारच’ असे आव्हान पोलिसांना दिले आहे. लोकप्रतिनिधी व नेत्यांनी कायदा मोडला तर लोकांना कायद्याचा धाक कसा वाटणार? प्रक्षोभक विधाने करून नेते कोणता संदेश देऊ इच्छितात?

LEAVE A REPLY

*