राज्यात 2019 मध्ये परिवर्तन अटळ : धनंजय मुंडे

0

 11 भ्रष्ट मंत्र्यांना फडणवीसांची क्लीन चिट

अहमदनगर (प्रतिनिधी) – देशातील तसेच राज्यातील भाजप सरकार फेकू सरकार आहे. अच्छे दिनच्या नावावर या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. जनतेला हे आता समजले आहे. 2019 मध्ये राज्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास व्यक्त करत या परिवर्तनामध्ये राष्ट्रवादीचा वाटा सिंहाचा असणार असून अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
भिंगार येथे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार दादा कळमकर, आमदार संग्राम जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, माणिक विधाते, मुस्सा सय्यद आदी यावेळी उपस्थित होते.
ना. मुंडे यांनी आपल्या खास शैलीत मोदी-फडणवीस सरकारवर टिका करताना, त्यांनी जनतेला कसे फसवले याची पोलखोल केली. साडेतीन वर्षे उलटून गेली तरी अजून जनता अच्छे दिनची वाट पाहत आहे. 15 लाख रूपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याच्या आश्‍वासनाची खिल्ली उडविताना उलट जनधन खाते उघडण्याकरीता खिशातील दोन हजार रुपये गेले.
महागाईच्या मुद्यावर सरकार चूप आहे. नोटाबंदीची झळ सामान्यांना सहन करावी लागत आहे. श्रीमंतांचा पैसा घरपोहोच काळ्याचा पांढरा झाला. गरीब मात्र लाईनमध्ये उभा होता. देशात मोदींनी सबका साथ सबका विकास तर राज्यात सत्तेवर येताना देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, पारदर्शक सरकार अशी हाक दिली. फडणवीस सरकारमधील 11 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले. फडणवीस यांनी मात्र, प्रत्येकाला क्लीन चिट दिली.
देशातील विकास वेडा झाला तर राज्यातील पारदर्शकता ही कागद वेचते आहे, असे सांगत मुंडे यांनी भाजपची खिल्ली उडविली. फसवणूक झाल्याचे जनतेला आता कळले आहे. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन अटळ असून राष्ट्रवादीचा त्यात सिंहाचा वाटा असणार आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होतील. 2019 च्या युध्दाची सुरूवात नगरमधून सुरू झाल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
तसेच पावलोपावली भाजप सरकार फसवणूक करत आहे. भाजपवाल्यांची खिल्ली उडविली जात आहेे. विकास वेडा झाल्याची चेष्टा चौकाचौकात सुरू आहे. मोदींनी ज्या प्रकारे आश्‍वासने देऊन जनतेची फसवणूक केली अगदी तशीच फसवणूक त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून फडणवीस करत आहेत, असे सांगत मुंडे यांनी आपल्या स्टाईलने फडणवीस सरकारवर टीका केली.

LEAVE A REPLY

*