दोन कोटी खर्च करून कोपरगाव शहरातील सर्व पथदिव्यांवर एलईडी

0
कोपरगाव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर
कोपरगाव (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून दोन कोटी रुपये खर्च करून कोपरगाव शहरातील सर्व पथदिव्यांवर एलईडी दिवे लावून शहर सुशोभिकरणावर भर देण्याबाबतचा ठराव पालिका सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेेते रवींद्र पाठक, योेगेश बागुल यांनी दिली.
कोपरगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी होती. विषपत्रिकेवरील 23 विषयांवर वादळी चर्चा होऊन ही सभा साडेपाच तास चालली. त्यात मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्यावर काय कार्यवाही झाली. याबाबतची विचारणा सर्वच नगरसेवकांनी केली असता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना त्याची उत्तरे देण्यासाठी सभागृहाचा दोन तासांचा वेळ खर्ची झाला.
या चर्चेत नगरसेवक जनार्दन कदम, स्वप्नील निखाडे, कैलास जाधव, सत्येन मुंदडा, मंगला आढाव, दिपा गिरमे, ताराबाई जपे, सपना मोरे, ऐश्‍वर्या सातभाई, हर्षा कांबळे, सुवर्णा सोनवणे, अरिफ कुरेशी, विद्या सोनवणे, शिवाजी खांडेकर आदींनी चर्चेत भाग घेतला. शहरात आरोग्य स्वच्छता पिण्याचे पाणी वीज आदी मुलभ्ाूत गरजांचा वाणवा आहे. नागरिक गेल्या आठ महिन्यांपासून हवालदिल झाले आहेत, त्यावर नगराध्यक्ष म्हणून काय कार्यवाही केली, अशी थेट विचारणा गटनेते रवींद्र पाठक यांनी केली.
त्यावर घनकचरा, पाणीपुरवठा तृतीय ठेका मुदतवाढीस तीव्र विरोध करण्यात आला व नव्याने ठेका मागवावा, अशी यावेळी सूचना करण्यात आली. शहरात डेंग्यू, मलेरिया आदी साथींचे आजार वाढले आहेत, त्यावर जंतूनाशक व धूर फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार कोल्हे यांच्या अभिनंदनाचा ठरावही मांडण्यात आला. त्यांनी माजी सैनिकांची घरपट्टी माफ करावी म्हणून पालिकेकडे मागणी केली होती. त्यावर सदरचा प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्याबाबतचा निर्णय करण्यात आला.
नगर विकास अभियंता विजय पाटील व प्रभारी आरोग्याधिकारी अरण यांना नगरसेवकांनी धारेवर धरले. नगराध्यक्षांच्या दालनात नेहमीच अन्य व्यक्तींचा भरणा असतो त्यामुळे महिला नगरसेविकांना नागरिकांच्या मुलभ्ाूत प्रश्‍नांवर नगराध्यक्षांशी चर्चा करता येत नाही. तेव्हा त्यांच्या दालनातील गर्दी कमी करावी, अशी मागणी कैलास जाधव यांनी केली.
लक्ष्मीनगर भागातील रहिवाशांना त्यांच्या मालकीचे उतारे मिळावेत व गेल्या 50 वर्षांपासून वास्तव्य असलेल्या सफाई कर्मचार्‍यांना स्वःमालकीची घरे देण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक स्वप्नील निखाडे यांनी केली. शहरातील कालिंदीनगर, समतानगर, रिध्दीसिध्दीनगर, अंबिकानगर आदी उपनगरात पथदिवे नाहीत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो, तेव्हा येथे तात्काळ पथदिव्यांची व्यवस्था करावी.
बाजार समितीसमोरील रस्त्यांचे काम वर्षानुवर्षे सुरू आहे. ते का पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे पावसाळ्यात विविध रस्त्यांना खड्डे पडले आहेत, त्याची दुरूस्ती का होत नाही, अशी विचारणा नगरसेवक जनार्दन कदम यांनी केली. शहरासाठी नव्यांने 42 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना सध्या सुरू आहे, त्यावर जीवन प्राधिकरणाच्यावतीने पर्यवेक्षक नेमण्याच्या ठरावाला यावेळी मान्यता देण्यात आली. जाहिरात कराबाबतचे दर ठरविताना फेरविचार करावा, अशी मागणी सत्येन मुुंदडा यांनी केली.

कोपरगाव बाजार समितीवर नगरसेवकांतून सेना-भाजपा युतीच्यावतीने शिवाजी खांडेकर यांना प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात यावे, अशी मागणी गटनेते रवींद्र पाठक यांनी केली असता प्रतिस्पर्धी गटाकडूनही एका प्रतिनिधीचे नाव सूचविण्यात आले. त्यामुळे सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यावर रवींद्र पाठक यांनी प्रत्यक्ष मतदान घेण्याचीच मागणी केली. शेवटी सहमतीने शिवाजी खांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

LEAVE A REPLY

*