Friday, May 3, 2024
Homeनगरपारनेर : सोयरिकीच्या कारणावरून माजी सैनिकाचा खून

पारनेर : सोयरिकीच्या कारणावरून माजी सैनिकाचा खून

जातेगाव येथील घटना ः गावात तणाव, आरोपी पसार

सुपा (वार्ताहर)- अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव (ता. पारनेर) येथील माजी सौनिकाला वादातून आपला जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी सीमेवरील सेवा संपवून आलेल्या मनोज संपत औटी (वय-38) या माजी सैनिकाला सोयरिकीच्या कारणावरून अक्षरशः दगड, काठ्या, लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले. उपचार सुरू असतानाच गुरूवारी त्यांचे निधन झाले.

- Advertisement -

पारनेर तालुक्यातील जातेगाव येथे सोयरीकीच्या वादातून सोमवारी (दि.8) जिल्हा परिषद शाळेजवळ सायंकाळी 6.30 वाजता गुड्डू उर्फ सौरभ गणेश पोटघन, विकी उर्फ दिनेश पोटघन व अक्षय बापू पोटघन यांच्यासह अन्य चार-पाच जणांनी माजी सौनिक औटी यांना बेदम मारहाण केली. काहींनी दगडाने तर काहींनी काठी, गज आणि लोखंडी रॉडने हल्ला चढविला. या मारहाणीत तो जीव वाचविण्यासाठी ओरडत असताना काही आरोपींनी त्याचे तोंड दाबून धरत मारहाण केली. हालचाल बंद झाल्यानंतर आरोपी पळून गेले. मारहाण झाल्याचे समजताच मनोज औटी यांच्या नातेवाईकांनी त्यांना पारनेर येथे उपचारासाठी नेले.

तेथे त्रास होऊ लागल्याने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस मृत्युशी लढत दिल्यानंतर गुरूवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. औटी यांचा भाऊ तुषार संपत औटी (वय-33, रा. वेताळवाडी, जातेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुड्डू उर्फ सौरभ गणेश पोटघन, विकी उर्फ दिनेश पोटघन व अक्षय बापू पोटघन (सर्व रा. जातेगाव) या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरवातीला आरोपींवर संघटित हाणामारी करणे, हत्यार वापरणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. जखमीचे उपचार चालू आसताना निधन झाल्याने आता खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.

या घटनेमुळे गावात तणाव असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. घटनेतील तीनही आरोपी पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. अहमदनगर येथे मृतदेहाची उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. माजी सौनिक औटी काही दिवसांपूर्वीच आपली सेवा संपवून घरी आले होते. किरकोळ कारणावरून त्यांना जीव गमवावा लागल्याने जातेगाव परिसरात आरोपींविरूद्ध संताप व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या