शिर्डी नगरपंचायत शौचालयात दगडाने ठेचून तरुणाचा खून

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डीतील बसस्थानकासमोरील शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात 45 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड तसेच लोखंडी रॉड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत शिर्डी पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला असल्याचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.

शनिवारी सकाळी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात दरवाजात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, सहा पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे, क्यु. आर.टी. चे जवान उपस्थित होते.

सदरचा मृतदेह शहरातील एका भिकार्‍याचा असल्याचे सांगण्यात आले. घटनेची सत्यता पडताळणीसाठी शहरातील सर्व भिकार्‍यांना पकडून बसस्थानकासमोरील स्वागत कक्षात आणले आहे. या सर्वांची चौकशी करून सोडून देणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले. तपासासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. श्वानाने घटनास्थळापासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत माग काढला.

शिर्डीत भिकार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. यावर शिर्डी पोलीस, साईबाबा संस्थान तसेच नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने मोहीम हाती घेऊन अनेकांना त्यांच्या घरी रवाना करण्यात आले होते. त्यानंतर करोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर या काळात खाण्यापिण्याची गैरसोय झाल्याने अनेक भिकारी स्वतःहून शहर सोडून गेले. मात्र आता पुन्हा शहरात भाविकांची गर्दी नसतानाही भिकार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यातच एका भिकार्‍याच्या खुनाची घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *