जळगाव : कुसुंबा येथे डंपरच्या धडकेत तरुण ठार

जळगाव प्रतिनिधी | 

कामावरुन रिक्षाने घरी जात असताना रिक्षाजवळ उभे असलेल्या तरुणाला मागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास कुसुंबा येथे घडली.

वाळूने भरलेल्या डंपर चालक फरार झाला असून डंपर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी डंपर चालकाचा विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईश्वर रतन मिस्तरी (वय 35,रा.कुसुंबा) हे गवंडी काम करतात. तसेच काही वेळा चटईच्या फॅक्टरीत काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

सोमवारी सकाळी चटई कंपनीतून काम करुन रिक्षाने कुसुंबा येथील देवा सायकल मार्टसमोर उतरले. त्याचवेळी मागून येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपर क्रमांक (एमएच 19 झेड 75 57) जोरदार धडक दिली. यात ईश्वर मिस्तरी यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात घडल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताचा पंचनामा करुन डंपर ताब्यात घेतले.

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची एकच गर्दी जमली होती. मयताची पत्नी शितल या मुलांसोबत जामनेर येथे माहेरी गेलेल्या होत्या.

त्यांच्या पश्चात पत्नी शीतल, दोन मुले करण आणि हितेश व मुलगी निशा तर लहान भाऊ संदीप असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिसात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.