यंदा झेडपी, पंचायत समितीच्या बदल्या नाहीत !

ग्रामविकास विभागाकडून आदेशावर शिक्कामोर्तब

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात 4 मे रोजी अर्थ विभागाने काढलेल्या आदेशावर ग्रामविकास विभागाने शिक्कामोहर्तब केल्याने यंदा विनंती बदलीला पात्र असणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांची अडचण होणार आहे.

दरवर्षी ग्रामविकास विभागात असणार्‍या जिल्हा परिषदे अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक शिक्षक यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांच्या बदल्या होत असतात. यंदा करोना संसर्ग आणि त्यानुषंघाने राज्य आणि केंद्र सरकारने आरोग्य विभागावर जास्तीत जास्त निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राज्यातील करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यावर करण्यात येणार्‍या खर्चाची रक्कम तोकडी पडू नयेत, यासाठी येत्या वर्षभरात नव्याने कामे न घेता शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बदल्या न करण्याचे धोरण अर्थ विभागाने घेतले होते. यासाठी त्यांनी 4 मे रोजी परिपत्रक काढले होते. त्या आदेशाला अधिन राहून ग्रामविकास विभागाने अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या यंद न करण्याचा निर्णय घेतला आहे.