Friday, April 26, 2024
Homeनगरपहिल्याच सभेत घुले-विखे वादंग

पहिल्याच सभेत घुले-विखे वादंग

चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीत सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या पहिल्याच विशेष सभेत विद्यमान अध्यक्षा राजश्रीताई घुले आणि माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्यात खटके उडताना दिसले. विशेष म्हणजे माझ्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे स्पष्टीकरण मला द्या, अशी मागणी विखे करत असताना अचानक वंदेमातरम्ला सुरूवात करण्यात आली. यामुळे सभा संपल्यानंतर माजी अध्यक्षा विखे, सदस्य राजेश परजणे यांनी या घटनेचा निषेध केला.

- Advertisement -

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष सभा पार पडली. यात सुरूवातीला श्रध्दाजंलीच्या ठरावापासून आदळ-आपटला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेचे माजी प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांचे नाव श्रध्दांजलीच्या ठराव घेण्यास प्रशासन विसल्याने सदस्य परजणे, माजी अध्यक्षा विखे, सदस्य जालिंदर वाकचौरे आक्रमक झाले. सदस्य उज्वला ठुबे यांनी शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करण्याचे नियोजन करणार असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. केशव कातोरे यांनी जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. मिलींद कानवडे यांनी त्यास अनुमोद दिले.

त्यानंतर सभेच्या विषय पत्रिकेवर सदस्य परजणे यांनी आक्षेप घेत, प्रशासनाने अध्यक्षा घुले यांना चुकीचे मार्गदर्शन करू नयेत, आधी विषय समित्या रिक्त जागांवर सदस्यांची निवड करण्याचा विषय एकनंबरला घेऊन त्यानंतर सभापतींकडे पदभार सोपविण्याचा विषय घेणे आवश्यक असल्याचे सांगताच प्रशासाने आपली चुक मान्य केली. त्यानंतर पदाभार सोपविण्यासह विषय समित्यामध्ये रिक्त झालेल्या सदस्यांच्या जागा भरण्याचे अधिकार अध्यक्षा घुले यांना देण्याचा ठराव संदेश कार्ले यांनी मांडला. त्यास परजणे, कानवडे, फटांगरे, माधवराव लामखडे, शरद नवले यांनी अनुमोदन दिले. याच दरम्यान माजी अध्यक्षा विखे यांनी सेनेचा प्रतोद कोण असा सवाल उपस्थित केला.

त्यानंतर पंचायत समितीच्या नूतन सभापतींच्या सत्कारावरून सत्ताधार्‍यांना विरोधकांनी चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. विशेष सभा असतांना विषय पत्रिकेवर नेवासा तालुक्यातील गॅस पाईपलाईन टाकण्याच्या विषय घेण्यात आल्यावर अनिल कराळे यांनी आक्षेप घेतला. कोणाच्या फायद्यासाठी हा विषय घेतल्याचे त्यांनी प्रश्‍न केला. सभापती सुनील गडाख यांनी हा विषय आधी स्थायी समोर चर्चेसाठी ठेवून त्यानंतर सर्वसाधारण सभेत ठेवण्याच्या सुचना केल्या. या विषयावरून कधी प्रशासन आणि सदस्य तर कधी सदस्य आणि सत्ताधारी असे खटके उडत राहीले. यावेळी सभापती परहर आणि परजणे यांच्यात शाब्दीक चकमकही झाली. सभेच्या शेवटी अध्यक्षा विखे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे स्पष्टीकरण मागितले आणि काही कळण्याच्या आत वंदे मात्र्मला सुरूवात झाली आणि सभा संपली. यामुळे माजी अध्यक्षा विखे यांनी संताप व्यक्त केला, तर परजणे यांनी निषेध केला.

विखे थेट स्थायी समिती सभागृहात
चर्चा सुरू असतांना सभा गुंडाळ्याने संतप्त झालेल्या विखे यांनी अध्यक्ष कार्यालया शेजारी असणार्‍या स्थायी समिती सभागृह गाठले. त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.पाटील यांना बोलाविण्यात आले. सभा सुरू असतांना कोणाच्या सांगण्यावरून राष्ट्रगित सुरू करण्यात आले, याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. तसेच नेवासा तालुक्यातील अपघातात मृत पावलेल्या शालेय मुलीच्या कुटूंबियांना भरपाई देण्यास टाळाटाळ होत असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. याचवेळी अध्यक्षा घुले त्या ठिकाणी आल्या. त्यानंतर सभापती सुनील गडाखही आले. यावेळी परजणे यांनी सर्वांनी एकमेंकांचा मान सन्मान ठेवला पाहिजे, अशी भूमिका घेतली. तर विखे यांनी अध्यक्षांच्या कार्यालया समोरच आंदोलन करण्याचा इशारा देत वंद मातरम सुरू करणार्‍या कर्मचार्‍याला बोलविण्याचा आग्रह धरला. अखेर त्या कर्मचार्‍यांला सर्वासमोर बोलविण्यात आले आणि वंदे मात्र्म कोणाच्या सांगण्यावरून सुरू केले अशी विचारणा करताच त्यांने सदस्य उभे राहिल्याने वंद मातर्म सुरू केल्याचे सांगत आपली चुक झाल्याचे सांगत, माफी मागितली. यावेळी झालेल्या प्रकाराचा सदस्या हर्षदा काकडे यांनी निषेध केला. सभा सुरू होण्याआधीच तिळगुळ वाटपावरून आजी-माजी अध्यक्षात शाब्दीक कोट्या झाल्या.

लिफ्ट अन् सदस्यांची वाहने
जिल्हा परिषदेच्या लिफ्टचे आयुष संपले असून त्या ठिकाणी नवीन लिफ्ट बसविणे आवश्यक आहे. नवीन पदाधिकार्‍यांच्या जीवाला जुन्या मुदत बाह्य लिफ्टमुळे काही झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल सदस्य शरद नवले यांनी विचारला. त्यावर बजेटमध्ये तरतूद करा, नवीन लिफ्ट घेण्यात येईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी सांगितले. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आवारात खासगी लोक आणि ठेकेदार यांच्या चारचाकी वाहनामुळे सदस्य आणि पदाधिकार्‍यांना वाहने लावता येत नसल्याचा आरोप जालींदर वाकचौरे यांनी केला. त्यावर सभागृहात खसखस पिकली.

- Advertisment -

ताज्या बातम्या