Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

झेडपीची कडबाकुट्टी संगमनेरवर प्रसन्न!

Share
झेडपीच्या अर्थसंकल्पात कोरोना बाधीतांवर उपचारासाठी तरतूद, Latest News Zp Budget Corona Treatment Ahmednagar

‘असमतोल’ वाटपावरून असंतोष : वाटप नियोजनात बदल होण्याची शक्यता ?

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे देण्यात येणार्‍या कडबाकुट्टी वाटपाच्या नियोजनात असमतोल झाला आहे. जिल्हा परिषद स्वनिधीतून राबविण्यात येणार्‍या या 75 लाख रुपये खर्चाच्या योजनेत 833 कडबाकुट्टींपैकी एकट्या संगमनेरच्या वाट्याला 218 कडबाकुट्ट्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे विद्यमान कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते यांच्या पारनेर तालुक्याच्या वाट्याला अवघ्या 39 कडबाकुट्ट्या आहेत. यावरून जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये संघर्षाची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दरवर्षी कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना कडबाकुट्टीचा लाभ दिला जातो. त्यासाठी तालुका पातळीवरून अर्ज मागवून घेतले जातात व त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, सभापती यांच्या शिफारशीवरून कृषी समितीच्या मासिक लाभार्थी निवडले जातात. जिल्ह्यात शेतकर्‍यांची संख्या मोठी असल्याने दरवर्षीच कडबाकुट्टीला मोठी मागणी असते.

त्यातुलनेत निधीची तरतूद होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे यापूर्वी देखील कडबाकुट्टीवरून वादंग झाल्याचे पहावयास मिळालेले आहे. त्यातच यंदा देखील जिल्हा परिषदेतील कृषी विभागाकडून कडबाकुट्टीचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी 75 लाखाची तरतूद असून 833 लाभार्थी निवडले जाणार आहेत. प्रति लाभार्थ्याला 9 हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे.

त्यानूसार कृषी विभागाने तालुकानिहाय लाभार्थीचे नियोजन केले आहे. कडबाकुट्टीच्या वाटपात नियोजन करताना सर्व तालुक्याला समान वाटप करण्याऐवजी संगमनेर तालुक्याला झुकते माप देण्यात आले. मुळात लाभार्थी निवडताना सोडत पद्धतीने निवडणे गरजेचे असताना येथे मात्र सदस्यांच्या शिफारशीवरून समितीच्या बैठकीत निवडी होत असल्याने कमी कडबाकुट्टी मिळालेल्या सदस्यांनीही त्यावर बोलण्याऐवजी नियोजन बदलण्यावर आग्रह धरला आहे.

आठ दिवसांपासून या विषयावर कृषी विभाग आणि जिल्हा सदस्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. दरम्यान, तालुकानिहाय लाभार्थी निवडीचे अधिकार कृषी समितीला असून समितीने निवडीचे नियोजन केले असल्याचे समोर आले आहे. येत्या 17 तारखेला कृषी समितीची बैठक होणार असून त्यात पुन्हा विषय घेण्यात येणार असून त्यावेळी काही प्रमाणात वाटप नियोजनात बदलाची शक्यता आहे.

असे आहे वाटप
अकोले 73, संगमनेर 218, कोपरगाव 40, राहाता 49, राहुरी 42, श्रीरामपूर 38, नेवासा 65, शेवगाव 40, पाथर्डी 44, जामखेड 15, कर्जत 38, श्रीगोंदा 56, पारनेर 39, नगर 76 -एकूण 833

अन्य विभागांचे काय
जिल्हा कडबाकुट्टी नियोजनात असमतोल समोर आल्यानंतर अन्य विभागाचे काय असा सवाल काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. ज्याच्या हाती काठी, त्याची म्हैस या तत्वाने त्या-त्या विभागावर वर्चस्व असणार्‍यांनी निधीचे तूप आपल्या पोळीवर ओढून घेतले आहे. मग एकट्या कृषी विभागावर ठपका का? बांधकाम, रस्ते, अन्य व्यक्तीगत साहित्याच्या योजनांचे वाटप देखील जाहीर करण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे.

17 रोजी कृषी समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. यावेळी कडबाकुट्टी योजनेची माहिती घेणार आहे. या योजनेसंदर्भात कोणतीच लेखी स्वरूपात माहिती माझ्याकडे नाही.
-काशिनाथ दाते, सभापती कृषी समिती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!