Wednesday, April 24, 2024
Homeनगर‘बांधकाम’वरून आघाडीत ओढाताण

‘बांधकाम’वरून आघाडीत ओढाताण

संयुक्त बैठक निष्फळ : आज सकाळी पवार, थोरात, गडाख, शिंदे जाहीर करणार निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी आज निवड होणार आहे. या विषय समित्यांमध्ये सर्वात मलाईदार म्हणून पाहिल्या जाणार्‍या बांधकाम समित्यांवर जिल्हा परिषदेच्या महाआघाडीतील सर्वच पक्षांचा डोळा आहे. यामुळे सोमवारी रात्री उशीरा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सभापतिपदावर एकमत होत नसल्याने आता हा निर्णय आज सकाळी राष्ट्रवादीकडून उपाध्यक्ष अजित पवार, काँग्रेसकडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि शिवसेनेच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे निर्णय जाहीर करणार आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम, कृषी, महिला बालकल्याण आणि समाज कल्याण समितीच्या सभापती पदाची आज निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी नगरमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची आधी स्वतंत्र त्यानंतर एकत्रित बैठक झाली.

यावेळी राष्ट्रवादीकडून पक्ष निरिक्षक अंकूश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ. चंद्रशेखर घुले, काँग्रेसकडून युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, उपाध्यक्ष प्रताप शेळके, शिवसेनेकडून मंत्री संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी चर्चा केली. क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे मंत्री शंकरराव गडाख आणि गट नेते तथा सदस्य सुनील गडाख हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

काल सायंकाळी आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांची बैठक झाली. यात सर्वच शक्यता आणि विषय समित्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर सेनेचे नेते त्या ठिकाणी आले. मात्र, बांधकाम समिती कोणाला द्यावयाची याबाबत एकमत न झाल्याने सकाळी श्रेष्ठी सोबत चर्चा करून ऐनवेळी निर्णय घेण्याचे ठरले.

बांधकाम समितीसाठी शिवसेनेसोबत क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून सुनील गडाख देखील इच्छुक आहेत. मात्र, चर्चेत ही समिती कोणाच्या वाट्याला जाणार यावर सभापती अवलंबून आहे. गडाख हे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सध्या ज्येष्ठ सदस्य आहेत. यामुळे त्यांना या पदावर संधी मिळावी, असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील सदस्यांचे मत आहे. तर समाजकल्याण समितीसाठी राष्ट्रवादीमधील कोपरगाव आणि कर्जत तालुक्यातील सदस्य आणि नेते आग्रही आहेत. बांधकाम समितीचा तिढा सुटल्यास कृषी आणि समाजकल्याण समितीचा विषय निकाली निघणार आहे. शिल्लक राहणार्‍या महिला बालकल्याण समितीसाठी काँग्रेसचे श्रीरामपूर तालुक्यातील नेते आग्रही आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या