Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरजिल्हा परिषदेत आघाडीच्या सदस्यांनाच झुकते माप

जिल्हा परिषदेत आघाडीच्या सदस्यांनाच झुकते माप

पालकमंत्र्यांची स्पष्टोक्ती : भाजपकडूनच शिकल्याचा दावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे निधी देताना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आघाडीच्या सदस्यांनाच झुकते माप राहणार, हे आम्हाला भाजप सरकारनेच शिकविले आहे, असे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे भाजपचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी निधी वाटपात विरोधी सदस्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात पत्रकार परिषदेत पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या आरोपाची माहिती मला जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी दिली. मात्र आम्ही कोणत्याही निधीबाबत कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेत आहोत.

सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांना झुकते माप देण्याचा आरोप करण्यात आला. मागील पाच वर्षांत त्यांनीच आम्हाला हे शिकविले आहे. आमच्याकडून कोणावर अन्याय होणार नाही, पण निधी वाटपात आघाडीच्या सदस्यांनाच झुकते माप राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

2014 साली आमचे सरकार जाऊन भाजपचे सरकार आले. त्यावेळीही त्यांनी आम्ही मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली होती. सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही. मात्र विरोधी पक्षनेते उठसूठ राज्यपालांना भेटायला जात आहेत. करोना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप भाजप करत असला, तरी करोनामुळे महाराष्ट्रात जी परिस्थिती उद्भवली, त्यास मध्य प्रदेशमध्ये मध्यंतरी झालेले राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.

ते म्हणाले, या काळात बाहेरून येणार्‍या लोकांना थोपविण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा तज्ज्ञ करतात. तसेच या काळात बाहेरून 35 लाख लोक आल्यामुळे करोना फैलावला गेला. त्यांना वेळीच क्वारंटाईन केले असते, तरी आज देशातील लोकांना घरात बसण्याची वेळ आली नसती.

फडणविसांनी राजभवनात रूम घ्यावी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते उठसूठ राज्यपालांना भेटायला जात असल्याबद्दल मुश्रीफ यांनी खिल्ली उडविली. ते म्हणाले, फडणवीस यांना मलबार हिल वरून राजभवनात जाण्यास वेळ लागत असल्याने त्यांनी आता राजभवनातच एक रूम घेऊन रहावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या