Friday, April 26, 2024
Homeनाशिकजि. प. सीईओ बदलीसाठी भुजबळांना साकडे; अध्यक्ष सांगळे, सभापती पगार यांनी घेतली...

जि. प. सीईओ बदलीसाठी भुजबळांना साकडे; अध्यक्ष सांगळे, सभापती पगार यांनी घेतली भेट

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या धीम्या गतीने सुरू असलेल्या कारभारामुळे विकासकामांचा निधी खर्च होत नसल्याची तक्रार अध्यक्ष शीतल सांगळे व सभापती यतिंद्र पगार यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करीत त्यांची बदली इतरत्र करावी, अशी मागणी केली. या प्रकरणात लक्ष घातले जाईल, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले.

- Advertisement -

अध्यक्ष सांगळे व सभापती पगार यांनी सोमवारी भुजबळ हे नाशिक दौर्‍यावर आले असता त्यांंची भेट घेतली. यावेळी त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. भुवनेश्वरी एस. यांच्या धीम्या गतीने चालणार्‍या कारभारामुळे विकासकामांंचा निधी खर्च होत नसल्याचा आरोप सदस्यांनी करत फाईली वेळेत काढल्या जात नाहीत. सदस्यांसह पदाधिकार्‍यांची कामे त्या करत नसून लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवत नसल्याचे सदस्यांनी यावेळी सांगितले.

प्रामुख्याने विकासकामांसाठी आलेला निधी नियोजनाअभावी खर्च झाला नसून तो तसाच पडून असल्याचे सदस्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. सभापती पगार यांनी भुवनेश्वरी एस. यांच्या एककल्ली काराभाराचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. विकासकामांसाठी येणार्‍या निधीचे वेळेत नियोजन होत नसल्याने हा निधी अखर्चित आहे. पदाधिकार्‍यांनी सांगितलेल्या कामाबाबत शिफारस केली असता सदरचे काम न करता याउलट संबंधित व्यक्तीला राजकीय दबाव आणल्यामुळे तुमच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल व निलंबनाबाबत धमकावण्यात येत आहे. पदाधिकारी व सदस्यांंचा सन्मान ठेवत नसल्याचे पगार यांनी यावेळी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यासाठी चांगल्या कामकाजासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी सभापती पगार यांनी यावेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या