Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

तरुणाईची पावले गुन्हेगारी जगताकडे वाढत असल्याने चिंता

Share
डिझेल चोरांचा पाठलाग करताना राहुरी पोलीस जखमी, Latest News Police Injured Rahuri

टाकळीभान (वार्ताहर)- ऐशोरामी जीवन जगण्याच्या स्वप्नात असलेल्या तरुणाईची पावले दिवसेंदिवस गुन्हेगारी जगताकडे ओढली जात असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. आतापर्यंत पोलिसांनी विविध गुन्ह्यांत अटक केलेले गुन्हेगारांमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही बालगुन्हेगार असल्याचेही निष्पन्न झाले आहे. शिक्षण व कामधंद्यांकडे दुर्लक्ष करुन ही तरुणाई गुन्हेगारी जगताकडे का वळत आहे? हे शोधून तरुणाईत प्रबोधन होणे गरजेचे वाटू लागले आहे.

गेल्या काही वर्षांत दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी, रस्तालूट, घडफोड्या, खंडणी, मुलींची छेडछाड, अत्याचार, विनयभंग या प्रकारच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. वाळूतस्करी, गौण खनिजाची तस्करी या गुन्ह्यातही चांगलीच वाढ झालेली आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा एकतरी कमी पडत आहे किंवा गुन्हेगारांचे प्रशासकीय यंत्रणेशी साटेलोटे आहे, असे म्हणावे लागेल. त्यामुळे गुन्हेगार व्हाईट कॉलरने खुलेआम प्रशासकीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून गुन्हे करीत आहेत.

त्यामुळे छोटा गुन्हा करणारा गुन्हेगार गुन्हेगारीचे एकावर एक टप्पे पार करीत समाजात स्वतःची दहशत निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात पोलीस प्रशासनाने अनेक गुन्ह्यांची उकल करीत अनेक गुन्हेगारांना जेरबंद केलेले आहे. यातील बहुतांश गुन्हेगार हे 18 ते 25 वयोगटातील आहेत. तर काही बालगुन्हेगार आहेत. मोठ्या गुन्ह्यातील बालगुन्हेगारांना काही काळ बालसुधारगृहात ठेवून सोडून देण्यात येते तर छोट्या गुन्ह्यातील बालगुन्हेगारांना अटक न करताच समज देऊन सोडून देण्यात येते. त्यामुळेच या बाल गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळते तर विविध गुन्ह्यातील आरोपी अटक होऊनही जामिनावर बाहेर येऊन साक्षी पुराव्याअभावी निर्दोष सुटून गुन्हेगारी जगतात आपले स्थान निर्माण करीत आहेत.

18 ते 25 वयोगटातील तरुणाई शिक्षण व कुटुंबाला कामधंद्यात मदत करण्यापेक्षा भौतिक सुखांना बळी पडत आहेत. महाविद्यालयात, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे काही विद्यार्थीही छंदी फंदी व ऐशोरामी जीवनाचे स्वप्न पहात झटपट लखपती होण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग अवलंबत आहेत. काबाडकष्ट करणारे आईवडील आपला पाल्य शिकतो आहे, या आशेने त्याचे कोडकौतुक करीत असतात. मात्र त्या पाल्याला भौतिक सुख खुणावत असल्याने तो गुन्हेगारीकडे वळला जातो.

पूर्वी शहरी भागात ही प्रवृती दिसून येत होती. मात्र आता तिची बिजे ग्रामिण भागातही खोलवर रुतली जात आहेत. शहरी भागातील विद्यार्थ्यांचे झकपक राहाणीमान, पॉकेट मनी, महागड्या दुचाक्याचा वापर ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना हवाहवासा वाटू लागल्याने त्यांची पावले गुन्हेगारी जगताकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागातील पोहचलेला गुन्हेगार त्यांचा वापर करुन घेत स्वतःचे गुन्हेगारी विश्व मजबूत करताना दिसत आहे. मात्र सर्वसामान्य जनतेला या गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्रास होऊनही निमूटपणे सहन करावा लागत आहे.

हल्ली पोलिसांनी गुन्ह्याची उकल करुन अटक केलेले बहुतांश गुन्हेगार हे 18 ते 25 वयोगटातील असल्याने ही चिंतेची बाब आहे. भविष्यातील देश घडवणारा तरुणच गुन्हेगारीकडे वळला जात असल्याने त्यावर गंभीरपणे मंथन होऊन भौतिक सुखामागे धावणार्‍या या तरुणाईसाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!