Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुख्यमंत्री ठाकरे शब्द पाळणारे; त्यांच्यामुळेच शंकरराव नामदार

Share
मुख्यमंत्री ठाकरे शब्द पाळणारे; त्यांच्यामुळेच शंकरराव नामदार, Latest News Yashwantrao Gadakh Statement Newasa

मंत्री गडाख व जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नागरी सत्कार सोहळ्यात यशवंतराव गडाख यांचे प्रतिपादन

नेवासा (तालुका वार्ताहर)- बंगल्या सारख्या किरकोळ कारणांचा अट्टाहास घेऊन नाराज होवू नका, संधी मिळाली त्याचे सोने करा. शेतकर्‍यांचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवा. उद्धव ठाकरे हे कसलेले कलावंत असून सरळ व साधे आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे दिलेला शब्द पाळणारे आहेत, त्यांनी दिलेला शब्द पाळल्यानेच शंकरराव गडाख नामदार झाले असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ नेते व माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केले.

ना. शंकरराव गडाख यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल तर राजश्री घुले यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविवारी ज्ञानेश्वर सांस्कृतीक प्रतिष्ठाण येथे नागरी सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी श्री. गडाख बोलत होते.

माजी आमदार नरेंद्र घुले अध्यक्षस्थानी होते तर नामदार शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख, दिलीप लांडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, काँग्रेसचे विनायक देशमुख उपस्थित होते. माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या हस्ते नवनिर्वाचीत पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, नगर पंचायतच्या नगराध्यक्षा योगीता पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

नामदार शंकरराव गडाख यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, राजकारण हे खूप अवघड असते. त्याचे अनेकांना चटके सहन करावे लागतात. मला देखील त्याची झळ सोसावी लागली आहे. ज्यावेळी क्रांतिकारी कडून लढायचा निर्णय घेतला त्यावेळी विश्वास होता. परंतु काही प्रमाणात मनात किंतू होता. अपक्ष लढावे की नाही.

त्याचवेळी भाजपासह राष्ट्रवादी, काँग्रेस सगळेच पक्ष संपर्क करत होते. परंतू भाजपसारखा पक्ष हात धुऊन आमच्या मागे लागला होता. निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजपची ऑफर आली होती; त्यावेळी मी ठरवले होते की घरी बसेल. पण भाजपात जाणार नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदार काय अन् किती त्रास देऊ शकतो हे त्यावेळी दिसून आले. आता तर मी नामदार झालो आहे.

मात्र मी कोणत्याही विरोधकाला त्रास देणार नाही. झाले गेले विसरून जावून मनात काही आकस न ठेवता सगळ्यांना माफ केले आहे. अडचणीच्या काळात नेहमीच मातोश्री वर उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात होतो. त्याकाळी त्यांनी मला मोठा धीर दिल्याने निवडून आल्यानंतर विनाशर्त शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी अनेक अडचणी असताना देखील दिलेला शब्द पाळत कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली.

नेवासे तालुक्यातील विरोधकांनी जवळची माणसे का लांब गेली, केवळ देवाचे नाव घेऊन काही होत नसते तर नियत साफ ठेवावी लागले याचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ आल्याचा टोला माजी आमदार मुरकुटेंना लगावला. मी स्वतःच मंत्री पदासाठी उत्सुक नव्हतो कारण आपला तालुका विचीत्र आहे, कधी डोक्यावर घेईल तो पायदळी घेणारा आहे.

परंतु आता मोठी जबाबदारी पडल्याने तुम्ही सगळे मला साथ द्याल अशी अपेक्षा आहे कारण राज्यात प्रभावी कामे करायची आहेत. राज्याची जबाबदारी सांभाळताना आपल्या तालुक्याची मान खाली जाणार नाही याची काळजी घेऊन एक उत्कृष्ट मंत्र्याला साजेसे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शंकरराव गडाख नामदार झाल्यामुळे आपल्या नेवासे शेवगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांना कसलीही अडचण येणार नाही. मंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला जास्त निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले म्हणाले, आपली क्रांतीकारीची बॅट अशी जोरदार फिरली की विधानसभेत तर पोहचलीच, परंतु थेट कॅबीनेट मध्ये जावून पोहचली.

त्यामुळे या नामदार पदाच्या माध्यमातून घाटमाथ्यावरचे धऱणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवले तर नगर बरोबरच औरंगाबाद, बीड, नांदेड, हिंगोली अशा अनेक जिल्ह्याच्या पाण्याची चिंता कायमची मिटणार आहे. या प्रकरणात सगळे आमदार तुमच्या निर्णयात पाठींबा देतील असे सांगीतले. गडाखांना मिळालेल्या संधीचे ते नक्कीच सोने करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शंकरराव हे साधे व्यक्तीमत्व असेल. आत एक बाहेर एक असे काही नसते. जनतेला फक्त आपल्या ताटात माती कालवणारा माणूस नको असतो. तर काही राजकीय ताकदीचा वापर करून पोलिसांचा वापर करून कार्यकर्त्यांवर दडपशाहीचा वापर करून आत-बाहेर करण्याचे काम करणारा जास्त काळ टिकत नाही.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले, मधल्या काळात गैरसमज होऊन गडाख-घुले कुटूंबात कटूता आली होती. त्याची झळ दोन्ही तालुक्यांना सहन करावी लागली. आता एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर दोघांना नामदार होण्याची संधी आली. त्यामुळे आता भविष्यात कायम एकोपा ठेवा. मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी प्रास्ताविक केले.

भाऊ असावा तर प्रशांत गडाख सारखा
भावाच्या निर्णयाची जबाबदारी घेऊन ती पार पाडण्यासाठी मनापासून प्रयत्न करत पाठबळ देऊन लढ म्हणणारा भाऊ मिळायला नशीब लागते. तर ज्यांना अनेक वर्ष मंत्री केले. विरोधीपक्ष नेतेपद दिले, सगळेकाही दिले ते अकोल्याचे लोकांना सोडून निघून गेले. लोकांना सोडून गेल्यावर काय होते हे पिचडांची अवस्था पाहून समजते असे नरेंद्र घुले यांनी सांगितले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!