Saturday, April 27, 2024
Homeनगरमाजी खासदार यशवंतराव गडाखांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निधीसाठी 5 लाखांची मदत

माजी खासदार यशवंतराव गडाखांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निधीसाठी 5 लाखांची मदत

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – ज्येष्ठ नेते व साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तिक म्हणून 5 लाखांची मदत जाहिर केली आहे.

या रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यावर जमा केला आहे. सध्या संपूर्ण देशाला चिंतेत टाकणाऱ्या कोरोना या व्हायरसच्या आजाराशी लढण्यासाठी सरकारला मोठ्या निधीची गरज लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री निधीसाठी यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल केले होते.

- Advertisement -

‘कोरोनामुळे सगळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. करोडो हातांची रोजीरोटी हिरावली गेली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मोठ्या संख्येने लोक स्वत:चे गाव सोडून इतर भागात अडकून पडले आहेत. त्यांच्या पोटापाण्याची व खुशालीची मोठी समस्या उभी राहिली आहे. अशा सर्व गरजूंना हातभार म्हणून या निधीचा वापर व्हावा’ अशी अपेक्षा यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली आहे. तसेच गरज लागेल तेंव्हा आपल्या सर्वांनाच अजूनही त्या निधीत भर टाकावी लागणार आहे असेही ते म्हणाले.

‘कोरोना हे एक मोठे सामाजिक संकट आहे. त्याचा मुकाबला फक्त सरकार करू शकणार नाही. त्यात आपण सर्वांनाच सहभागी व्हावे लागेल. सध्या सर्वांनी सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन केले पाहिजे. संयम ठेवून घरी थांबले पाहिजे व आरोग्याची सर्व प्रकारे काळजी घेतली पाहिजे. एकमेकांच्या सहकार्याने व एकजुटीन नक्कीच हे संकट संपवू शकतो. या प्रश्नामध्ये पक्ष, राजकारण, आपसातील वाद कुणीही आणू नये ‘ असे आवाहन श्री. गडाख यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या