Thursday, April 25, 2024
Homeनगरसाफसफाई बंद, कचरा संकलनाच्या गाड्याही उभ्या

साफसफाई बंद, कचरा संकलनाच्या गाड्याही उभ्या

मनपा कर्मचारी युनियनने केल्या अत्यावश्यक सेवा बंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वच्छता निरीक्षकला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ महापालिका कर्मचारी युनियनने शुक्रवारी (दि 3) नगर शहरातील अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा आज सार्वजनिक स्वच्छतेवर परिणाम जाणवला. शहरातील साफसफाई झाली नाहीच, उलट घरोघरी फिरून कचरा संकलन करणारी खासगी ठेकेदाराची वाहनेही मनपा कर्मचारी युनियनने बाहेर पडू दिली नाहीत. दरम्यान, सायंकाळपर्यंत युनियनने आपले आंदोलन मागे घेतलेले नसल्याने आणखी किती दिवस अशी स्थिती राहील, याबाबत अनिश्चितता आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या दोन स्वच्छता निरीक्षकांना शिवसेनेच्या नागापूर-बोल्हेगाव परिसरातील नगरसेविका रिता भाकरे यांच्या जवळच्या नातेवाईकांना मारहाण केली. त्यातील एक गंभीर जखमी झाला असून, दोघांवरही खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश भाकरे फरार असून, त्यास जोपर्यंत अटक होत नाही, तो पर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी कामकाज बंद ठेवले आहे.

यात साफसफाई, फवारणी, कचरा संकलन अशा अत्यावश्यक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. सफाई करणारे कर्मचारी शुक्रवारी कामावर आले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा साचलेला होता. अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणारा पाणीपुरवठा मात्र सुरळीत चालू होता. तसेच मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील काम देखील सुरळीत होते. शहरातील आरोग्य केंद्रात कर्मचार्‍यांची संख्या रोडावलेली होती. मारहाण प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक होत नाही, तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला.

दरम्यान, मारहाण प्ररकरणी अटक असलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यातील पाच आरोपी अद्यापही मोकाट असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. प्रथमेश पाटोळे, गौरव भाकरे, अतुल भाकरे असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांना नागापूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ आणि अविनाश हंस यांना मारहाण करण्यात आली होती. नगरसेविकेचा दीर आरोपी निलेश भाकरे व त्याचे 7 ते 8 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर तपास करत आहे.

प्रस्ताव पाठवा, काम सुरू
स्वच्छता निरीक्षकांना मारहाण करणारा प्रमुख आरोपी निलेश भाकरे यांच्यासह इतर काही यापूर्वी अभियंत्याच्या अंगावर बुट फेक प्रकरणातही आरोपी आहेत. त्यामुळे भाकरे यासह फरार आरोपींना अटक करावी आणि शिवसेनेच्या नगरसेविका रिता भाकरे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा, अशी मागणी मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केली आहे. त्याशिवाय अत्यावश्यक सेवा सुरू करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारी पंच द्या
पोलीस ठाण्याने या मारहाण प्रकरणी महापालिकेला पत्र देऊन सरकारी पंच म्हणून महापालिकेचे कर्मचारी देण्याबाबत सांगितले. प्रकरण महापालिकेशी संबंधितच असल्याने महापालिकेचे पंच कशाला, असा सवाल उपस्थित करत महापालिकेने असे पंच देण्यास नकार कळविला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या