महिला तहसीलदारवर हल्ल्याचा प्रयत्न

श्रीगोंदा, शिरूरचे दोन वाळूतस्कर जेरबंद

शिरूर (प्रतिनिधी)- अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई करण्यासाठी निघालेल्या शिरूरच्या महिला तहसीलदार एल.डी.शेख यांच्यावर पाळत ठेऊन हल्ल्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपींपैकी एकाला शिरूर पोलिसांनी तर दुसर्‍याला गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली.
अशोक सहादू वाखारे (रा.वाखारवाडी, हिंगणी, ता. श्रीगोंदा, अहमदनगर),स्वप्नील साहेबराव जाधव ( रामलिंग, शिरूर ) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे इतर साथीदार अद्याप पसार आहेत.

शुक्रवारी (दि.14) पहाटे साडेतीन वाजता शेख या कारवाईसाठी जात असताना त्यांच्या घराची हेरगिरी करून त्यांना दमदाटी केल्याच्या घटनेची फिर्याद शिरूर पोलिसांत तहसीलदार यांनी दिलेली असून वाळूतस्करांच्या या मुजोरीमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती.
सोमवार दि.17 रोजी रात्री उशीरा पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश जगदाळे व पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे यांनी यातील एकाला पकडले तर दुसर्‍याला अटक करण्याची कामगिरी गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक पद्माकर घणवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड,सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, ज्ञानेश्वर क्षिरसागर, जनार्दन शेळके, राजू मोमीन, काशिनाथ राजापरे यांनी केली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *