Thursday, April 25, 2024
Homeनगरमहिला बचत गटांकडून 11 लाखांच्या मास्कची विक्री

महिला बचत गटांकडून 11 लाखांच्या मास्कची विक्री

लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला रोजगार

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना संसर्गामुळे एकीकडे शहरी भागात मास्काचा तुटवडा जाणवत असतांना नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी कापडी मास्क निर्मितीचे काम हाती घेतले आहे. कॉटनच्या कपड्यापासून तयार करण्यात येणारे हे मास्क सर्वसामान्यासाठी किफायतशीर ठरत असून रोज धूवून ते वापरता येणार आहेत. गेल्या 15 दिवसात जिल्ह्यातील 16 महिल्या बचत गटांनी 78 हजार 700 मास्कची निर्मिती करून त्याद्वारे 10 लाख 64 हजार रुपयांची उलाढाल केली आहे. यामुळे ऐन लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात ग्रामीण भागात बचत गटातील महिलांच्या हाती काम मिळाले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देवून त्यांच्याकडून वर्षभर विविध साहित्य आणि उत्पादनाची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाच्या मार्केटींगसाठी जिल्हास्तरावर मार्केटींग अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे खर्‍याअर्थाने महिला बचत गटांच्या उत्पादन्नाला आता हक्काची बाजारपेठ उपलब्ध होतांना दिसत आहे.

सध्या जगभर कोरोना विषाणूचा विळखा वाढत असून कोरोनापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मास्कला मागणी आहे. अतिरिक्त मागणी आणि कमी उत्पादन्न यामुळे शहरी भागात मास्काचा काळाबाजार सुरू आहे. तर एकादा वापरून फेकून देणार्‍यात येणार्‍या (युज अ‍ॅण्ड थ्रो) मास्काच्या किंमतीत ग्रामीण भागात महिला बचत गटांनी तयार केलेल्या कॉटनच्या मास्काला मागणी वाढत आहे. सध्या लॉकडाऊन मुळे सर्व काही ठप्प आहे. मात्र, मास्कची निर्मिती करणार्‍या महिलांच्या हाताला घर बसल्या काम मिळाले आहे. गेल्या 15 दिवसांत जिल्ह्यातील महिला बचत गटांनी 78 हजार 700 हजार मास्करची निर्मिती केली आहे. या मास्कच्या विक्रीतून 10 लाख 64 हजार 500 रुपयांची उलाढाल झाली आहे.

अशी आहे विक्री
रमाई बचत गट अकोळनेर 15 हजार, एकता बचत गट 40 हजार, सिध्दी आणि पायल बचत गट सावळीविहीर प्रत्येकी 12 हजार, पुजा बचत गट मोहटा आणि कृष्णा बचत गट नायगाव प्रत्येकी 50 हजार, धनश्री बचत गट संगमनेर 30 हजार, हिरकणी बचत गट श्रीगोंदा 37 हजार 500, आदिशक्ती बचत गट 58 हजार 500, श्री शक्ती बचत गट 37 हजार 500, युगांधर बचत गट श्रीरामपूर 20 हजार, गहिनीनाथ बचत गट पिंपळगाव पांगोरी 30 हजार, सर्व शक्ती बचत गट 45 हजार, साई पुष्प बचत गट 30 हजार असे 10 लाख 64 हजार 500 रुपयांची मास्कची विक्री झालेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या