Thursday, April 25, 2024
Homeनगरतब्बल 52 दिवसांनंतर श्रीरामपूरची बाजारपेठ सुरू

तब्बल 52 दिवसांनंतर श्रीरामपूरची बाजारपेठ सुरू

दारूच्या दुकानासमोर रांगा; पालिकेच्या पथकाकडून बाजारपेठेवर नियंत्रण

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दिड-पावणे दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशानुसार व श्रीरामपूर नगरपालिकेने केलेल्या नियोजनानुसार काल श्रीरामपुरातील बाजारपेठ उघडण्यात आली. दुकानदारांचा अर्धा दिवस दुकानातील करण्यातच गेला. शहरात काल खरेदी करणार्‍यांपेक्षा रस्त्यावर फिरणार्‍या बघ्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. तर नगरपालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांची सात पथके बाजारपेठेतील दुकानावर नियंत्रण ठेवत होते.

- Advertisement -

व्यापारी असोसिएशनने प्रांत अधिकार्‍यांकडे केलेली मागणी, त्याला जिल्ह्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेला पाठिंबा आणि नागरिकांची उत्सुकता या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने मंगळवारी संध्याकाळी उशीरा शहरातील बाजारपेठ उघडण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार काल सकाळी मुख्य बाजारपेठेतील सर्व रस्त्यांवर एका बाजूची दुकाने उघडण्यात आली. मेनरोड, शिवाजी रोडवर पश्चिम मुखी तर नेवासा संगमनेर रोडवर दक्षिणमुखी दुकाने सुरू करण्यात आली.

सकाळपासूनच दुकानदारांनी आपली दुकाने उघडून थाटण्यास सुरुवात केली. बारा वाजेपर्यंत दुकानातील झाडलोट व स्वच्छता सुरू होती. कारण दिड महिन्यापेक्षा जास्त काळ दुकाने बंद असल्यामुळे दुकानात सर्वत्र धूळ साचलेली दिसून आली. रस्त्यावर दुकानात जाणार्‍या ग्राहकांपेक्षा रस्त्यावर फिरणार्‍या बघ्यांचीच गर्दी अधिक प्रमाणात होती. त्यात गेल्या 52 दिवसांपासून रस्त्यावर पहारा करणारे पोलिस कर्मचारीही दिसत नसल्याने शहरात कामासाठी येणार्‍यांचे दडपण कमी झाल्याचे दिसत होते.

बाजारपेठेतील दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेने आपल्या कर्मचार्‍यांची सात पथके तयार केली. प्रत्येक पथकामध्ये दहा ते पंधरा लोकांचा समावेश होता. त्यांना नेमून दिलेल्या रस्त्यावर हे सर्व लोक दुकानदारांना व नागरिकांना सूचना देत होते. तर मुख्याधिकारी समीर शेख, उपमुख्याधिकारी प्रकाश जाधव व त्यांचे सहकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. व्यापारी पेठेतील दुकानदारांनी ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था केली होती. काल बाजारपेठेत ग्राहकांची संख्या तुरळक असली तरी एक दोन दिवसात बाजारपेठ सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

रस्ता मोकळा करा
शहरातील सर्वत्र रस्ते सुरू करण्यात आलेले असताना श्रीरामपूर शहराला दक्षिणोत्तर जोडणार्‍या सय्यदबाबा चौकातील धान्य गोडाऊन जवळ बंद केलेला रस्ता मात्र सुरू करण्यात न आल्याने वार्ड नंबर 1, 2, गोंधवणी रोड, पंजाबी कॉलनी, मिल्लतनगर या भागातील लोकांना रेल्वे पुलाच्या पलिकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालून यावे लागत होते. सगळीकडे जर बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे तर हा रस्ता देखील मोकळा करण्यात यावा. संध्याकाळी पाच नंतर सकाळी नऊ पर्यंत तो बंद करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मद्यविक्री दुकानासमोर रांगा
व्यावसाय सुरु करण्याबाबत माहिती नसल्याने काल पहिल्या दिवशी अनेक व्यापार्‍यांनी वृत्तपत्रातील बातमी वाचल्यानंतर आपली दुकाने उघडली, परिणामी ग्राहकांची सख्या तुळरक होती. मात्र मद्यविक्रीच्या दुकानांसमोर खरेदीसाठी मद्यपींच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगा येणार्‍या जाणार्‍या लोकांचे लक्ष वेधून घेत होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या