Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरपाणी चोरी रोखण्यासाठी मुळा पाटबंधारेची धडक मोहीम

पाणी चोरी रोखण्यासाठी मुळा पाटबंधारेची धडक मोहीम

रात्रंदिवस गस्त घालून वीजपंप व स्टार्टर-केबल जप्तीची कारवाई सुरु

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – सध्या सुरू असलेल्या आवर्तनाचे वेळी मुळा उजव्या कालव्यातुन पाईपद्वारे व पंपाने होणारी पाणी चोरी रोखण्यासाठी मुळा पाटबंधारे विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे.

- Advertisement -

मुळा उजव्या कालव्यातून 20 मार्चपासून उन्हाळी आवर्तन सुरू आहे. या कालव्याची एकूण लांबी 52 किलोमीटर असून वहन क्षमता 46.72 घनमीटर/सेकंद आहे. उजव्या कालव्याखाली राहुरी, नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील ओलिताखालील शेतजमिनीचे क्षेत्र 73 हजार हेक्टर आहे.

सध्या उजव्या कालव्याचे आवर्तन 1650 क्यूसेकने सुरू आहे. त्यापैकी राहुरी, नेवासा तालुक्यातील घोडेगाव-नेवासा उपविभागातील सिंचन सुरू आहे. त्याचबरोबर उजव्या मुख्य कालव्याचे नेवासा तालुक्यातील देडगाव येथील लाल गेटजवळ विभाजन होऊन ब्रँच-1 व ब्रँच-2 विभाजन झालेले आहे.

नेवासा-शेवगाव तालुक्याकडील ब्रँच-1 कालवा 340 क्युसेकने तर दुसरी ब्रँच-2 अमरापूर 200 तर पाथर्डीकडे 150 क्युसेकने पाणी चालू आहे. या आवर्तनासाठी सुमारे 30 हजार हेक्टर क्षेत्राची पाणी मागणी नोंदविली गेलेली आहे. त्यामुळे सर्वांना पाणी मिळावे आणि टेल टू हेड सिंचन करण्यासाठी पाटबंधारे विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत आहेत.

परंतु शेतकरी कालव्यावर पाईप व विद्युत मोटारी टाकून पाणी चोरी करत आहे. त्यामुळे टेलच्या भागाकडे पूर्ण दाबाने पाणी पोहचत नाही, परिणामी सिंचनासाठी लागणारा कालावधी वाढत जाऊन पाणी लॉसेस वाढत आहेत. त्यामुळे विद्युत मोटारी व पाईप ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या दृष्टीने पाटबंधारे खात्याकडून ‘हेड टू टेल’ कालव्यावर गस्त घालण्यासाठी पाटबंधारे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचे संयुक्त भरारी पथक नेमलेले आहे.

हे भरारी पथक रात्रंदिवस गस्त घालत आहे.कालव्यातून पाणी चोरी करणारे पाईप तोडण्यात येत असून पाणी उपसा करण्यासाठी कालव्यात टाकलेल्या विद्युत मोटारी (पंप) व केबल-स्टार्टर जप्त करण्यात येत आहे. प्रसंगी पोलीस कारवाईही करण्यात येत आहे.

गुरुवार दि. 9 एप्रिल रोजी नेवासा तालुक्यातील चिलेखनवडी उपविभागाअंतर्गत कुकाणा शाखा-1 खालील भेंडा परिसरात मुळा पाटबंधारे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचे भरारी पथकाने कालव्यातून पाणी चोरी करणार्‍या शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारीसह स्टार्टर-केबल जप्तीची कारवाई केली. उपअभियंता दहातोंडे यांचे मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता बाबासाहेब दुशिंग, कालवा निरीक्षक पोपट दरंदले, तांत्रिक सहायक श्री. आडसुळे, कर्मचारी श्री. कावले, दिलीप इधाटे, सुरक्षा रक्षक श्री. बर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सर्वांना पाणी मिळेल, सहकार्य करा
या आवर्तनासाठी पाणी मागणी नोंदविलेल्या सर्व शेतकर्‍यांना पाणी मिळेल, सर्वांची भरणे काढली जातील. परंतु सर्वांनी एकाच वेळी पाणी देण्याचा आग्रह धरू नये. कलम 144 लागू असल्याने जमावाने कालव्यावर गर्दी करू नये.पाणी चोरी करणाऱे व पाटबंधारे कर्मचार्‍यांवर हल्ले करणारांची मात्र गय केली जाणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत अडचणीच्या काळातही आवर्तन सुरू ठेवण्यात आलेले आहे. सर्व अधिकारी-कर्मचारी शेतकरी बंधूंची पिके जगावीत यासाठीच जीव धोक्यात घालून अत्यंत कमी मनुष्यबळात काम करीत आहेत. शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना सहकार्य करावे.
– किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे

- Advertisment -

ताज्या बातम्या