Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयेही बंद राहणार, परीक्षा पुढे ढकलल्या

Share

कोरोनासंगे नगरकरांचे युध्द सुरू

मुंबई- कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन आणि नागरिकांनी युध्द पुकारले असून या आजाराने हातपाय पसरू नये यासाठी सर्वजण प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. जिथे शक्य आहे, तेथे दक्षता घेतली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे.

मात्र, गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. यादृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-आर्चा सुरू ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले.

तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या असून सर्व विद्यापिठांच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित ठेवण्यात आल्या आहेत तसेच आता ग्रामीण भागातीलही शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. याक्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी.

ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. परदेशातील टुर्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्य शासन कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये याकरिता राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करावेत. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा व धार्मिक विधी शिवाय भाविकांसाठी तेथे प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करावा. व्यापक जनहित लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करावा. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीचा पहिला हप्ता म्हणून 45 कोटी रुपये विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असून ज्या प्रवाशांना घरी राहून क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. ही सर्व कार्यवाही करताना त्याला मानवी चेहरा असावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

यावेळी घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय

  • कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.
  • ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल.
  • केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.
  • आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार.
  • उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.
  • होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांची नेमणूक करावी.
  • धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा. 

कोरोनाला दूर ठेवण्यात महाराष्ट्रातील 442 जण ठरले यशस्वी !

राज्यात यवतमाळ येथे 1 आणि नवी मुंबई येथे 1 असे 2 कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 झाली आहे. राज्यात 108 लोक विलगीकरण कक्षात दाखल असून 1063 होम क्वारंटाइन आहे. त्यापैकी 442 जणांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. नगर जिल्ह्यातीलही आठ व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.

साईबाबांच्या आरतीसाठीचे पासेस बंद
कोरोना व्हायरसला अटकाव करण्याच्यादृष्टीने शिर्डीतील साईबाबांच्या आरतीसाठी काल सोमवार दि.16 मार्च 2020 पासून जनसंपर्क विभागाम़ार्फत देण्यात येणारे सर्व पासेस बंद करण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत पासेस देणे बंद करण्यात आलेले आहेत. फक्त साई समाधीचे दर्शन पास चालू राहतील, अशी माहिती साई संस्थानच्यावतीने देण्यात आली आहे.

सर्व शासकीय कार्यालयांतील बायोमेट्रिक हजेरी बंद
‘कोरोना’च्या प्रसारास प्रतिबंध घालण्यासाठी मंत्रालयासोबत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील कर्मचार्‍यांची उपस्थिती नोंदविण्यासाठीची बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी प्रत्येक विभागाने आस्थापना शाखेत हजेरीपट ठेवून त्याद्वारे कर्मचार्‍यांची हजेरी नोंदवावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

विद्यार्थी जिल्ह्यात परतले..
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शहरातील शाळा महाविद्यालयांना सोमवार पासून सुट्टी जाहीर केल्यामुळे अहमदनगर तसेच जिल्ह्यातून उच्च शिक्षण घेण्यासाठी पुणे येथे जाणार्‍या विद्यार्थ्यांंची संख्या मोठी असते. तसेच पुण्या-मुंबई, बरोबरच नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद आदी ठिकाणी वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी गेलेले अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आहेत. ते परतले आहेत. त्यामुळे माळीवाडा बसस्थानक पुन्हा फुलून गेले होते.

सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई- कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 40 च्या जवळपास पोहोचली आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण विभागाखाली येणार्‍या राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठ अंतर्गत येणार्‍या सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी जाहीर केला आहे. परीक्षा कधी घेण्यात याव्यात याबाबत 27-28 मार्चला आढावा घेण्यात येणार असल्याचेही मंत्री सावंत यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाखाली येणार्‍या शिक्षणसंस्था त्यांच्या सगळ्या परीक्षा 31 मार्च पर्यंत ढकलण्याचा निर्णय विभागाने घेतलेला आहे.

25 मार्चपर्यंत राज्यातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होम (घरून काम)चे आदेश देण्यात आले आहे.
25 तारखेपर्यंत प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम तत्त्वावर घरीच काम करतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!