Wednesday, April 24, 2024
Homeनगरव्हिजिलयन्स स्कॉडसाठी सेवानिवृत्त कर्मचार्‍याची नियुक्ती

व्हिजिलयन्स स्कॉडसाठी सेवानिवृत्त कर्मचार्‍याची नियुक्ती

महापालिकेचा प्रताप : आरोग्य विभागाने जुन्या यादीलाच घेतली आयुक्तांची मंजुरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – गर्दीच्या ठिकाणी एकत्र येऊ नये, म्हणून महापालिकेने नियुक्त केलेल्या व्हिजिलीयन्स स्कॉडमध्ये सेवानिवृत्त कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वच्छता अभियानावेळी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांचीच यादी पुढे सरकविल्याने हा घोळ झाला आहे.

- Advertisement -

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. गुरूवारी गर्दी होऊ नये म्हणून शहरातील बहुतांश व्यवहार बंद करण्यात आले. किराणा, दूध आदी अत्यावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले. शहराच्या मुख्य बाजारपेठेसह सावेडी, केडगाव, भिंगार आदी भागातील व्यवहार सायंकाळी पाच नंतर पटापट बंद झाली. हॉटेल्स, मद्यविक्रेते यांनीही आपली दुकाने बंद केली. यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती.

जिल्हा प्रशासन एवढे गांभिर्याने घेत असताना महापालिका मात्र आपला नेहमीचा भोंगर कारभार करत असल्याचे समोर आले आहे. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जमू नये, यासाठी त्यावर देखरेख ठेवण्यासाठी व्हिजिलीयन्स स्कॉडची नियुक्ती केली आहे. यामध्ये नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांवर देखरेख ठेवण्यासाठी एका पर्यवेक्षकाची नियुक्ती केली आहे. महापालिका आरोग्य विभागास यासाठी कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने कर्मचार्‍यांची नावे देऊन त्यांना तसे आदेश दिले.

हे करत असताना स्वच्छता अभियानात कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी जे कर्मचारी नियक्त केले होते, त्यांचीच नियुक्ती यावेळी करण्यात आली. आरोग्य विभागाने त्यावेळी असलेली कर्मचार्‍यांची यादी आयुक्तांपुढे सादर करून त्यास मंजुरी घेतली. यामध्ये एक कर्मचारी सेवानिवृत्त झालेला आहे. डिसेंबरमध्ये हा कर्मचारी सेवानिवृत्त झालेला असतानाही त्यांना मार्चमध्ये हा आदेश देण्यात आला.

यामुळे संबंधित कर्मचार्‍यासह इतर नियुक्त केलेले कर्मचारीही आचंबित झाले. कोरोनाबाबत केंद्र, राज्य सरकारसह जिल्हा प्रशासन एवढे गंभीर झालेले असताना महापालिकेच्या या कारभारामुळे कर्मचार्‍यांनीही संताप व्यक्त केला. या संदर्भात महापालिका आस्थापना विभागाकडे चौकशी केल्यानंतर आस्थापना प्रमुख मेहेर लहारे यांनी हात वर केले. व्हिजिलियन्स स्कॉड नियुक्त करण्याचा आदेश आरोग्य विभागाने काढलेला आहे. याबाबत मला काहीही कल्पना नाही. त्यातील एक कर्मचारी सेवा निवृत्त झालेला आहे. आस्थापनाने हे आदेश काढले असते, तर ही चूक झाली नसती, असे ते म्हणाले.

वसुलीवर मोठा परिणाम
महापालिकेने मार्चअखेर कर वसुलीची मोठी मोहीम उघडली होती. मात्र कोरोनाचे कारण देत थकबाकीदार वसुली कर्मचार्‍यांना घरात येण्यास प्रतिबंध करत आहेत. त्यात नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी बुधवारी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन शास्त माफ करण्याची मागणी केली. त्यास मायकलवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बोराटे यांनी सांगितले. तशा बातम्या आल्यामुळे ज्या थकबाकीदारांनी पुढील तारखांचे धनादेश दिले आहेत, त्यांनी संबंधित कर्मचार्‍यांकडे ते धनादेश परत देण्याची मागणी लावून धरली. शेवटी महापालिका उपायुक्त सुनील पवार यांना यासाठी पत्रक प्रसिद्धीस द्यावे लागले. शास्ती माफीचा कोणताही निर्णय झाला नसल्याने थकबाकीदारांनी धनादेश परत मागू नये, असे आवाहन त्यांना करावे लागले.

- Advertisment -

ताज्या बातम्या