Friday, April 26, 2024
Homeनगरजगण्यासाठी आमच्या हाताला काम द्या

जगण्यासाठी आमच्या हाताला काम द्या

विडी कामगार महिलांची आर्त हाक : नगरमध्ये घरोघरी झालेले लाक्षणिक उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोनाच्या पार्श्वभूमीवर चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली असून, या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या विडी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा व विडी विक्री करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यासह शहरात राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक) व नगर विडी कामगार संघटना (इंटक) च्यावतीने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी घरोघरी विडी कामगारांनी लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनात शहरातील तीन हजारपेक्षा जास्त विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.

- Advertisement -

शहरातील श्रमिकनगर, तोफखाना, दातरंगेमळा, शिवाजीनगर, भराडगल्ली, पद्मानगर, टांगेगल्ली, झारेकर गल्ली आदी शहराच्या विविध भागात विडी कामगारांनी राहत्या घरीच लाक्षणिक उपोषण करून जगण्यासाठी हाताला काम देण्याची आर्त हाक दिली. करोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन पुकारले आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपून चौथ्या टप्प्याला सुरूवात झाली असून, देशभर रेड, ऑरेंज व ग्रीन झोन जाहीर करण्यात आले आहेत.

ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, विडी मालकांनी लॉकडाऊन काळात केंद्र व राज्य सरकारने तंबाखू आणि तंबाखूजन्य विडी विक्री करण्यास मनाई केली आहे. सरकारने ही मनाई मागे घेतल्याशिवाय कारखाने सुरू करून विडी कामगारांना काम देऊ शकत नसल्याची भूमिका जाहीर केली. आंदोलनात कॉ.शंकर न्यालपेल्ली, अ‍ॅड.सुधीर टोकेकर, शंरराव मंगलारप, कॉ.बहिरनाथ वाकळे, संगिता कोंडा, कमलाबाई दोंता, लक्ष्मी कोटा, सरोजनी दिकोंडा, बुचम्मा श्रीमल, निर्मला न्यालपेल्ली, लक्ष्मी न्यालपेल्ली, शामला म्याकल, सुमित्रा जिंदम, लिला भारताल, शोभा बीमन, शमीम शेख, सगुना श्रीमल, कविता मच्चा, लक्ष्मी कोडम, शारदा बोगा, भारती न्यालपेल्ली, शारदा सुंकी, कल्पना मुत्याल, जयश्री मुत्याल आदी शहरातील विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.

तेलंगणा सरकारच्या धर्तीवर विडी कामगारांना जीवन भत्ता म्हणून दरमहा 2 हजार रुपये महाराष्ट्र सरकारने द्यावेत, केंद्र सरकारने केंद्रीय कामगार कल्याण निधीमधून प्रत्येक विडी कामगारास साडेसात हजार आर्थिक मदत द्यावी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असंघटित कामगारांना प्रत्येकी 1 हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले असून, तेथील 8 लाख विडी कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. याप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने विडी कामगारांना 2 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या