Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

Video # के. के. रेंजच्या रणभूमीवर युद्धाचा अप्रत्यक्ष सरावच !

Share

आग ओकणारे रणगाडे अन् तोफांनी अचूक वेधले लक्ष्य

अहमदनगर (प्रतिनिधी) – शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी रणनीती आखून लष्कराने केलेला हल्ला, आग ओकणारे रणगाडे आणि तोफांनी अचूक वेधलेले लक्ष्य, अत्याधुनिक हेलिकॉप्टरची साथ, हे दृश्य आहे लष्कराच्या नगर येथील के. के. रेंज केंद्रातील. लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडविताना तसेच कोणताही हल्ला परतविण्यास सक्षम असल्याचा दाखला देत ‘हम तय्यार’ असल्याचा संदेश या सरावातून लष्काराने दिला.

युद्ध कधीही होऊ शकते आणि त्यासाठी लष्कराने सदैव तयार असले पाहिजे, असे कायम म्हटले जाते. त्यासाठी नियमित सरावाची आवश्यकताही असते. लष्कराच्या या युद्धसज्जतेचे दर्शन नगरजवळील ‘के. के. रेंज’वर झालेल्या प्रात्यक्षिकांमधून दिसून आले. आपल्याकडील युद्धसामुग्री आणि अधिकारी आणि जवानांच्या पराक्रमाच्या बळावर बलाढ्य शत्रूलाही पाणी पाजण्याची ताकद लष्कराकडे असल्याचेच यातून सिद्ध झाले. नगरच्या ‘आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कूल’ (एसीसीएस) व ‘मॅकनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर’तर्फे (एमआयआरसी) युद्धप्रात्यक्षिक सुरू आहे. देशाच्या ‘मॅकनाइज्ड फोर्स’ साठी नगर हे अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. ‘एसीसीएस’ ही देशातील एक महत्त्वाची संस्था असून तेथे ‘मॅकनाइज्ड फोर्स’मध्ये दाखल होणार्‍या जवानांना आणि अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले जाते.

यात प्राथमिक आणि प्रगत तांत्रिक प्रशिक्षण, युद्धनीती प्रशिक्षणाचा समावेश असतो. आधुनिक काळात युद्ध फक्त रणगाडे आणि पायदळाच्या जीवावर लढता येणार नाही. तर त्यासाठी पायदळ, रणगाडे, हवाई दलाच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असणार आहे. तेच या प्रात्यक्षिकांमधून अधोरेखित झाले. रेंजच्या मर्यादा लक्षात घेत सुखोई आणि हेलिकॉप्टर्सना प्रत्यक्ष हल्ला करता आला नाही. तरीही, विविध रणगाड्यांनी लक्ष्याचा अचूक भेद केल्यानंतर रणगाड्यांवरील विमानभेदी मशिनगनमधून जवानांनीही आकाशातील लक्ष्य सहज भेदत उपस्थितांना थक्क केले.

या संपूर्ण प्रात्यक्षिकांमध्ये सर्व युनिट्समध्ये योग्य ताळमेळ दिसत होता. पूर्ण कारवाई दरम्यान असलेली सुसूत्रता लष्कराच्या सक्षम युद्धनीतीचे दर्शन घडवत होती. दारूगोळ्याची हाताळणी, तोफांचा वापर, देखभाल, क्षेपणास्त्रांची हाताळणी, शत्रूच्या तोफा आणि क्षेपणास्त्रांचा वेध घेण्यासाठी रडार यंत्रणा आदीचे प्रशिक्षण दिले जाते. दूरच्या डोंगरांवर असलेली शत्रूची ठिकाण, तोफा, बंकर उद्ध्वस्त करण्याची कामगिरी लष्करी तोफखान्याने अचूक पार पाडली.

त्याचबरोबर लष्कराच्या हवाई विभागाच्या रुद्र आणि चेतक हेलिकॉप्टरने अगदी जमिनीलगत उड्डाण करून युद्धपरिसराची रेकीही केली. या ‘महासंग्राम’ प्रात्यक्षिकांमध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानला पाणी पाजणारी बोफोर्स, भारतीय बनावटीची 120 मिमी मोर्टर्स, 105 मिमी 105 मिमी इंडियन फिल्ड गन, लाईड फिल्ड गन, 155 मिमी गन, 130 मिमी मिडियम गन अशा लष्कराच्या मुलुखमैदान तोफा एकाच वेळी सहभागी झाल्या होत्या. सर्वच तोफांमधून एकाच क्षणी होणारे फायरिंग अनुभवणे हा एक दुर्मिळ योग असल्याचे लष्करातील वरिष्ठ अधिकारीही सांगत होते.

रणगाडे, मिसाईलच्या ताकदीचे दर्शन…
‘एसीसीएस’च्या या प्रात्यक्षिकांमध्ये लष्कराचे रणगाडे, मिसाईल यांच्या ताकदीचे दर्शन घडले. चाल करून येणार्‍या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठीच्या ‘लाईन ऑफ मास अ‍ॅटॅक’ या प्रात्यक्षिकात रशियन बनावटीचे टी 55, टी 72, टी 90, भीष्म, भारतीय बनावटीचा एमबीटी अर्जुन हे रणगाडे, बंदूक एके 47, मोटर वाहक ट्रेक, मिसाईल, बॉम्ब आदींसह विविध शस्त्रांचा या प्रदर्शनात समावेश होता. तसेच लष्कराच्या हवाई विभागातर्फे (एव्हिएशन) चेतक व रुद्र या हेलिकॉप्टर्सनी अगदी जमिनीलगत उडत टेहळणी करून प्रत्यक्ष कारवाईत सहभाग घेतला.

आपल्याकडे असलेल्या रणगड्यांची क्षमता ही खूपच चांगली आहे. लक्ष्य भेदण्याची ताकद सुद्धा उच्च प्रतीची आहे. तसेच शत्रूपासून आपल्या रणगाड्यांचे संरक्षणही व्यवस्थित होऊ शकते. लष्कर नेहमीच नवनवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करीत आहे. अत्याधुनिक कॅमेरा आधुनिक ड्रोनचा वापर लष्करात केला जातो.
– एस. झा., मेजर जनरल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!